नांदेड, रवींद्र औंढेकर (प्रतिनिधी) : दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठी अवांतर वाचन अत्यंत आवश्यक असून, सातत्यपूर्ण वाचनातून लेखकाची वैचारिक बैठक समृद्ध होते. युवा लेखक आणि कवींनी केवळ लिहिण्यापुरते मर्यादित न राहता समाज, माणूस आणि आपल्या सभोवतालच्या वास्तवाचे सूक्ष्म निरीक्षण करावे. आपल्या लेखणीतून काळाचे प्रश्न, सामाजिक वास्तव आणि सामान्य माणसाच्या भावविश्वाला अभिव्यक्ती देण्याचा प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन प्रसिद्ध लेखिका अनुजा डोईफोडे यांनी केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम होत्या. प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत मंडळाचे उद्घाटन झाले. युवा लेखक-कवींना मार्गदर्शन करताना अनुजा डोईफोडे म्हणाल्या की, लेखक होण्यासाठी केवळ प्रतिभा पुरेशी नसून त्याला वाचन, चिंतन, निरीक्षण आणि अनुभवांची जोड असणे आवश्यक आहे. कविता किंवा लेखन हे केवळ शब्दांची मांडणी नसून त्यामागे संवेदनशील मन आणि व्यापक जीवनदृष्टी असली पाहिजे. विविध विषयांवरील पुस्तके वाचल्याने भाषेची समृद्धी होते, विचारांना दिशा मिळते आणि लेखनाचा आवाका वाढतो. नव्या पिढीतील लेखकांनी आपल्या स्वतंत्र शैलीचा शोध घेत असताना मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचाही अभ्यास करावा, असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, लेखकाने समाजापासून तुटून नव्हे, तर समाजाशी जोडले जाऊन लिहिले पाहिजे. आजच्या बदलत्या काळातील प्रश्न, तरुणांचे अनुभव, स्त्रीजीवन, ग्रामीण वास्तव, सामाजिक विषमता आणि मानवी नात्यांतील बदल यांचे भान साहित्यिकाने ठेवले पाहिजे. वाचनाची सवय, सातत्याने लेखन आणि स्वतःच्या लेखनाचे चिकित्सक परीक्षण या तीन गोष्टी नवोदित लेखकांसाठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर एंगडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दत्ता बडुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी ‘अभिनव’ भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. मराठी वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षपदी श्रुती जंबुरे, उपाध्यक्षपदी वंश नागडा, सचिवपदी सूरज नरवाडे यांची निवड झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंगेश अटकोरे यांनी केले, तर आभार श्रुती जंबुरे यांनी मानले. प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


