नांदेड,रविंद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : शीख तथा हिंदू समाजाचे पवित्र स्थान असलेल्या गोदावरी नदीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नदीचे पाणी हिरवे झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
नांदेड शहरातील सहा ते सात गटारांचे पाणी थेट गोदावरी नदीत सोडले जात असल्याने नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊन त्याचा रंग बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांना मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या प्रदूषणाची तातडीने दखल घेऊन आवश्यक सुधारणा व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शीख समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


