अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : सामाजिक प्रबोधनपर देखावे सादर केल्याबद्दल तेलिखुंट मित्रमंडळ ट्रस्ट या मंडळाला गेल्या चार-पाच वर्षांपासून सलग पारितोषिक मिळाले आहे. पूर्वनियोजन करून अतिशय कल्पकतेने देखावे सादर करणाऱ्या या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्त आवर्जून गर्दी करतात.
यावर्षी मंडळाने तरुणाईला असलेले मोबाईलचे आकर्षण, त्याच्या वापराचा अतिरेक, त्यातून निर्माण होणारा खोट्या प्रतिष्ठेचा भ्रम, तसेच त्यातून उद्भवणाऱ्या मानसिक, आर्थिक आणि वेळेच्या नुकसानासह कौटुंबिक घसरणीचा विषय घेऊन देखावा सादर केला. अखेरच्या दिवशी हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
देखाव्यासोबतच मंडळाने समाजातील मान्यवरांना आरतीसाठी निमंत्रित करण्याचा उपक्रमही राबवला. अखेरच्या दिवशी आरतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, जिल्हा संघचालक वाल्मीक कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह हिराकांत रामदासी, शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, प्रभागातील नगरसेवक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तेलिखुंट मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष संतोष सैंदर, उपाध्यक्ष रवींद्र म्हस्के, खजिनदार दिनेश सैंदर, सचिव तुषार रामदासी, तसेच संदीप मोकाटे आणि महेश निकम यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.


