बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमणे नियमितीकरणासाठी धोरण ठरणार

२०११ पूर्वीच्या शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणांचा होणार अभ्यास; तीन महिन्यांत अंतिम शिफारशींसह अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई  : बृहन्मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय जमिनींवर १ जानेवारी २०११ पर्यंत झालेली निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी राज्य शासनाने विशेष समिती स्थापन केली आहे. या अतिक्रमणांच्या नियमितीकरणासाठी सर्वंकष धोरण तयार करून पुढील तीन महिन्यांत अंतिम व स्पष्ट शिफारशींसह अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय विशेष समिती स्थापन केली आहे. राज्यभरातील शासकीय जमिनींवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत महसूल विभागाने २५ मार्च २०२६ रोजी धोरणात्मक निर्णय घेतला होता. मात्र, या शासन निर्णयाच्या कक्षेत बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. या क्षेत्रांतील राज्य तसेच केंद्र सरकारच्या जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी स्वतंत्र आणि सर्वंकष धोरणाची आवश्यकता असल्याने ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

समितीमध्ये कोणाचा समावेश?

विशेष समितीच्या अध्यक्षपदी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), पुणे महानगरपालिका (PMC), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) तसेच भूमि अभिलेख विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील सह आयुक्त (सामान्य प्रशासन) हे समितीचे सदस्य सचिव असतील.

प्रचलित धोरणांचा अभ्यास करून शिफारशी

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी SRA, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) तसेच इतर प्राधिकरणांच्या प्रचलित धोरणांचा अभ्यास समिती करणार आहे. त्यानंतर या क्षेत्रांसाठी सर्वंकष धोरणाबाबत शिफारशी करण्यात येणार आहेत.

तसेच केंद्र सरकार किंवा केंद्राच्या अधिनस्त प्राधिकरणांच्या जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या अनुषंगानेही समिती विशेष शिफारशी करणार आहे. समितीने आपली संपूर्ण कार्यवाही पूर्ण करून पुढील तीन महिन्यांत अंतिम आणि स्पष्ट शिफारशींसह अहवाल महसूल विभागाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

४० वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ६ डिसेंबरला

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : स्वर्गीय सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस समर्पित ४० व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६ चे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेतून पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा…

ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचा १७ नोव्हेंबरला नांदेडमध्ये सत्संग

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : तणावग्रस्त जीवनशैली, वाढती नकारात्मकता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे खचलेल्या मनांना सकारात्मकतेची नवी दिशा देण्यासाठी जगविख्यात आध्यात्मिक मार्गदर्शिका आणि प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी येत्या १७ नोव्हेंबर रोजी प्रथमच…