तिवसा , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : दुष्काळसदृश परिस्थिती आणि पावसाच्या दांडीमुळे होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा तिवसा दौरा शेतीच्या पाहणीपेक्षा भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळेच अधिक चर्चेत आला. पालकमंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन मदतीचे आश्वासन दिले. मात्र, तालुक्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी या दौऱ्याकडे फिरवलेली पाठ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रमुख चेहऱ्यांची अनुपस्थिती; ‘ऑल इज नॉट वेल’ची चर्चा
दौऱ्यात आमदार राजेश वानखेडे, आमदार प्रवीण पोटे व आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती होती. मात्र, तिवसा भाजपचे प्रमुख नेते मानले जाणारे रविराज देशमुख, अमित बाभूडकर, निवेदिता दिघडे आणि शंतनू देशमुख यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमालाच या नेत्यांची अनुपस्थिती राहिल्याने तिवसा भाजपमधील अंतर्गत मतभेदांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
विधानसभेची जुनी खदखद आणि नवे शक्तिकेंद्र
या अनुपस्थितीमागे भाजपमधील अंतर्गत सत्तासंघर्ष आणि जुनी नाराजी कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
उमेदवारीची जुनी जखम : विधानसभा निवडणुकीत रविराज देशमुख प्रबळ दावेदार असताना ऐनवेळी राजेश वानखेडे यांना उमेदवारी मिळाली. तिकीट न मिळाल्याने निर्माण झालेला असंतोष अद्याप कायम असल्याची चर्चा या गैरहजेरीमुळे पुन्हा रंगली आहे.
नव्या नियुक्त्या आणि गटबाजी : अमित बाभूडकर यांची भाजप ग्रामीण उपाध्यक्षपदी आणि जिल्हा दक्षता समितीवर झालेली निवड यामुळे पक्षात नवे शक्तिकेंद्र तयार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील विविध गटांमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
शेतकरी अडचणीत, भाजप राजकीय गणितात व्यस्त!
दुसरीकडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी किशोर पिंपळे व राजू बहाद्दरपुरे यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस व संत्रा पिकांची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून मदतीचे निर्देश देण्यात आले. तसेच वीजपुरवठा आणि सौरपंप दुरुस्तीबाबतही अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. एकीकडे शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत असताना, दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील अंतर्गत राजकारणाची चर्चा या दौऱ्यामुळे पुन्हा ऐरणीवर आली आहे.


