नांदेड, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : गणेशोत्सवाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात ‘गणेश मूर्ती विसर्जन, संकलन व पुनर्वापर मिशन’ स्थापन करून पीओपी (Plaster of Paris) मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र व शास्त्रोक्त धोरण लागू करावे, अशी मागणी पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या जयमाला ढाणकीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात नद्या, तलाव, विहिरी, खाड्या तसेच समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मूर्तींचे विसर्जन होते. पीओपीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नसल्याने त्यांचे अवशेष जलस्रोतांमध्ये साचण्याची शक्यता असते. त्यामुळे धार्मिक श्रद्धेला धक्का न लावता पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक पद्धतीने मूर्ती विसर्जनाची व्यवस्था निर्माण करण्याची गरज निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण विभागाने १ ऑगस्ट २०२५ रोजी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये पीओपी मूर्तींवर नियंत्रण, कृत्रिम विसर्जन तलाव, गणेश मंडळांची नोंदणी, मूर्तींची ओळख आणि जनजागृती यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे. मात्र, या मार्गदर्शक तत्त्वांपुरते मर्यादित न राहता राज्यभर एकसमान, मोजता येण्याजोगे आणि उत्तरदायित्व निश्चित करणारे धोरण असावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रस्तावानुसार पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांना प्रमुख नोडल यंत्रणा म्हणून जबाबदारी देण्यात यावी. नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांच्या समन्वयातून या मोहिमेची अंमलबजावणी करावी, अशी सूचना आहे. पीओपी मूर्तींचे अनिवार्य संकलन, डिजिटल नोंदणी, कृत्रिम विसर्जन तलावांची संख्या वाढवणे, मूर्तींची पुनर्प्राप्ती व पुनर्वापरासाठी स्वतंत्र प्रक्रिया विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पर्यावरणपूरक मूर्तींच्या वापराला प्रोत्साहन देतानाच संक्रमण काळात मूर्तिकारांना आवश्यक सहकार्य देण्याची भूमिकाही मांडण्यात आली आहे.
प्रशासकीय पातळीवर प्रत्येक पदाची जबाबदारी आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी सार्वजनिक पारदर्शकता डॅशबोर्ड तयार करावा. गणेशोत्सवानंतर दरवर्षी राज्यस्तरीय पर्यावरण लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. श्रद्धा आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधत ‘गणपती बाप्पा मोरया—स्वच्छ महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र’ हा आदर्श राज्यासमोर निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करून संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा ढाणकीकर यांनी व्यक्त केली आहे.


