अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : अकोले तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ, माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते अँड. के. डी. धुमाळ यांची सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ‘जीवनगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या सोळा वर्षांपासून कार्यरत असलेल्या आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून तसेच आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ ऑक्टोबरदरम्यान दोन दिवसीय जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत अँड. धुमाळ यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. अँड. धुमाळ यांनी संस्कृती, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. ते अंजिंक्य क्रिकेट क्लबचे अध्यक्ष तसेच अकोले नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. पर्यावरणप्रेमी तसेच ज्येष्ठ सामाजिक व सांस्कृतिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. अकोले येथील महर्षी अगस्त्य मुनी आश्रमाच्या सेवा कार्यात तसेच विश्वस्तांच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत.
‘प्रवरा परिक्रमा’ या सांस्कृतिक, जल व पर्यावरणविषयक उपक्रमाला त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच साखर कारखाना, सहकारी सोसायट्या, दूध संघ आदी महत्त्वाच्या संस्थांच्या व्यवस्थापनात लोकशिक्षण व मार्गदर्शनाची भूमिका त्यांनी बजावली आहे. वारकरी संप्रदायातील विविध उपक्रमांमध्येही त्यांचा हिरिरीने सहभाग राहिला आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले सामाजिक कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. ‘आनंदोत्सव’च्या यापूर्वीच्या पुरस्कारांनी अयोध्येतील राममंदिर न्यासाचे महासचिव स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, चार्टर्ड अकाउंटंट सी. एल. मथयान, कीर्तन केसरी सुनंदाप्रास रंगनाथबुवा धर्माधिकारी, संगीततज्ज्ञ प्राचार्य डॉ. मधुसूदन बोडेकर आदी मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. अँड. के. डी. धुमाळ यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


