नांदेड, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार २०२२ (प्राध्यापक संवर्ग) जाहीर झाला असून, नांदेड जिल्ह्यातील संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. गणंजय यज्ञेश्वरराव कहाळेकर हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक, साहित्यिक व संस्कृत क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
मुखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात संस्कृत विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. कहाळेकर यांना २९ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. संस्कृतच्या प्रचार-प्रसारासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ६४ उपक्रमांचे आयोजन केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणे व समित्यांवर त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. संशोधक मार्गदर्शक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे २६ शोधनिबंध प्रकाशित झाले असून, सहा संपादित पुस्तकांमध्ये त्यांच्या लेखांचा समावेश आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा, परिषद व चर्चासत्रांत त्यांनी ३३ वेळा सहभाग नोंदविला आहे. दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी सात पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध करून देण्याचे उल्लेखनीय कार्यही त्यांनी केले आहे. याशिवाय जलतरण क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध पदके मिळविण्याची कामगिरी त्यांच्या नावावर आहे. विविध संस्थांनी त्यांना सात पुरस्कारांनी सन्मानित केले असून, आता महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने त्यांच्या संस्कृतसेवेचा विशेष गौरव झाला आहे.
कहाळेकर यांच्या कार्याचा व्याप केवळ अध्यापनापुरता मर्यादित नसून संशोधन, संस्कृत प्रचार-प्रसार, सामाजिक बांधिलकी आणि क्रीडा क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे. ‘भर्तृहरिकृत नीतिशतकातील नीतिमूल्यांचे सामाजिकदृष्ट्या अध्ययन’ हा लघुशोध प्रकल्प त्यांनी पूर्ण केला आहे. ‘Worldwide’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेच्या Peer Reviewed समितीवर ते गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. UGC-HRDC औरंगाबाद तसेच डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ, सागर येथे त्यांनी व्याख्याने दिली आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधी शोधकार्यातील योगदानाबद्दल त्यांचा विशेष गौरव झाला आहे. २०२२ मध्ये त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, तर २०२३ मध्ये ‘राष्ट्रीय-युव-विव्दत्-सन्मानम्’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या बहुआयामी कार्याची ही उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.


