अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : वीज ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज असून, तिचा प्रामाणिक आणि कायदेशीर वापर करणे ही प्रत्येक वीज ग्राहकाची सामाजिक जबाबदारी आहे. वीज चोरी, अनधिकृत वीज जोडणी, मीटरमध्ये फेरफार, मीटर बायपास करून वीज वापरणे अथवा अन्य कोणत्याही अनधिकृत पद्धतीने वीज वापरणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरीपासून दूर राहून अधिकृत वीज जोडणीचा वापर करावा आणि वीज बिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरण अकोले उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्रीकांत सोनवणे यांनी केले.
सध्या राज्यातील वीज मागणी आणि उपलब्ध वीजपुरवठा यामध्ये तफावत निर्माण होत असल्याने विशेषतः संध्याकाळच्या वाढीव वीज मागणीच्या वेळेत भार नियमनाची परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी वीज वापराबाबत अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. संध्याकाळच्या वेळेत घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांनी एकाच वेळी मोठ्या क्षमतेची वीज उपकरणे सुरू न करता वीज वापराचे नियोजन करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
संध्याकाळच्या वीज मागणीच्या काळात शक्यतो पाणी गरम करण्यासाठीचे हीटर, गिझर, इस्त्री, एअर कंडिशनर, मोठ्या क्षमतेची मोटर तसेच इतर उच्च वीज वापरणारी उपकरणे टाळावीत किंवा त्यांचा वापर पुढील वेळेत करावा. या वेळेत विजेचा वापर प्रामुख्याने घरातील आवश्यक प्रकाश व्यवस्था आणि अत्यावश्यक उपकरणांसाठी करावा. ग्राहकांच्या सहकार्यामुळे वीज वितरण व्यवस्थेवरील ताण कमी करण्यास मदत होऊ शकते.
वीज चोरीमुळे वितरण व्यवस्थेवर अतिरिक्त भार
वीज चोरी आणि अनधिकृत वीज वापरामुळे वितरण व्यवस्थेवर अतिरिक्त भार पडतो. त्याचा परिणाम वीज वितरणाच्या गुणवत्तेवर होण्याबरोबरच प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांवरही अप्रत्यक्षपणे होतो. त्यामुळे वीज चोरीमुक्त आणि सुरक्षित वीज व्यवस्था निर्माण करण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे सोनवणे यांनी सांगितले.
सौरऊर्जेचा वापर वाढविण्याचे आवाहन
वीज बचतीसाठी ग्राहकांनी पर्यायी ऊर्जास्रोतांचा अधिकाधिक वापर करावा. पाणी गरम करण्यासाठी पारंपरिक वीज हीटरऐवजी सोलर वॉटर हीटरचा वापर करावा. तसेच शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध सौर कृषी योजनांचा लाभ घेऊन सौरऊर्जेवर आधारित कृषीपंपांचा वापर वाढवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. घरगुती वीज वापराबाबतही ग्राहकांनी अनावश्यक दिवे, पंखे आणि विद्युत उपकरणे सुरू ठेवू नयेत. ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करून विजेची बचत करावी. विशेषतः संध्याकाळच्या वाढीव मागणीच्या कालावधीत विजेचा काटकसरीने वापर करणे ही प्रत्येक ग्राहकाची जबाबदारी आहे.
वीज चोरीवर कठोर कारवाई
वीज चोरी किंवा अनधिकृत वीज जोडणी आढळल्यास संबंधित ग्राहकावर नियमानुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वीज चोरी पकडल्यानंतर कोणताही राजकीय दबाव, मध्यस्थी किंवा प्रलोभन मान्य केले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही महावितरणने दिला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद अनधिकृत वीज जोडणी, मीटरमध्ये फेरफार किंवा वीज चोरीचा प्रकार आढळल्यास त्याची माहिती महावितरणच्या संबंधित कार्यालयाकडे द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळे वीज चोरीला आळा घालण्यास आणि वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होईल. “आपली वीज—आपली जबाबदारी! वीज चोरीला नकार—राष्ट्रहिताला होकार! वीज वाचवा, भार कमी करा आणि सुरक्षित वीज व्यवस्थेसाठी महावितरणला सहकार्य करा,” असे आवाहन उपकार्यकारी अभियंता श्रीकांत सोनवणे यांनी केले आहे.


