तिवसा, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : तिवसा तालुक्यातील धोत्रा शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले असून, बुधवारी रात्री बिबट्याने एका बोकड्याची शिकार केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे शेतकरी, महिला मजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी घटनास्थळी पाहणी करून चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्राच्या आरएफओ शीतल धुते यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. माळेगाव बीटचे वनरक्षक निलेश पवार आणि हरीश देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली. बिबट्याने शिकार केलेल्या ठिकाणापासून अवघ्या दहा फुटांवर पांधन रस्ता आहे. या मार्गावरून शेतकरी आणि महिला मजुरांची नियमित वर्दळ असते. तसेच पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीही शेतात जावे लागते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वन विभागाकडून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे आणि रात्रीच्या वेळी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. बिबट्याचा तातडीने शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


