नांदेड : तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा परिसरातील गेट क्रमांक १ ते गुरुद्वारा श्री लंगरसाहेब या महत्त्वाच्या मार्गावरील अतिक्रमणांवर नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने बुधवारी धडक कारवाई केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या अतिक्रमणांमुळे गेल्या काही दिवसांपासून भाविक, पादचारी आणि वाहनचालकांना होणारा त्रास अखेर कमी झाला आहे. कारवाईनंतर हा रस्ता अधिक मोकळा आणि प्रशस्त झाला आहे.
तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथे देश-विदेशातून दररोज मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. त्यामुळे गुरुद्वारा गेट क्रमांक १ ते लंगरसाहेब हा मार्ग अत्यंत वर्दळीचा मानला जातो. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानदार, हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी पक्के ओटे, टपऱ्या आणि तात्पुरते शेड उभारण्यात आल्याने रस्त्याची जागा आणखी कमी झाली होती. विशेषतः गुरुद्वारात दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ भाविकांना आणि इतर पादचाऱ्यांना गर्दीतून मार्ग काढताना त्रास सहन करावा लागत होता.
जेसीबी, डंपरसह मनपाचे पथक रस्त्यावर
मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळी अतिक्रमण विभागाचे पथक जेसीबी, डंपर आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या बंदोबस्तात रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अनधिकृत ओटे, टपऱ्या, शेड, जाहिरात फलक आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने कायदेशीर बाबी स्पष्ट करत कारवाई सुरूच ठेवली. अखेर रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला.
१०२ अतिक्रमणांवर कारवाई
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, या मोहिमेत एकूण १०२ अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली असून ४ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर परिसरातील रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाविकांची सुरक्षितता, पादचाऱ्यांची सोय आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हे दाखल
महानगरपालिका प्रशासनाने यापुढे या मार्गावर पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गरज पडल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. ही कारवाई पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक निलाभ रोहन आणि अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, उपआयुक्त स. अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात करण्यात आली. अतिक्रमण विभाग, अनधिकृत बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. अतिक्रमण हटवल्यानंतर गुरुद्वारा परिसरातील रस्ता मोकळा झाल्याने स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


