नागपूर, मोहन जाधव ( प्रतिनिधी ) : बदलत्या काळानुसार समाजाची मूल्यव्यवस्था आणि जीवनशैलीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांची रुजवणूक करून संस्कारक्षम पिढी घडविणे हे आजच्या काळातील मोठे आव्हान आहे. घराघरांत, समाजात लहानांपासून युवा पिढीपर्यंत योग्य संस्कार रुजविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. आदर्श आणि सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी संस्कारांची ही चळवळ सातत्याने पुढे नेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन संस्कार भारतीच्या प्रांत अध्यक्ष श्रीमती कांचन गडकरी यांनी केले. संस्कार भारती आणि सनातन सांस्कृतिक कला व क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग येथे आयोजित कृष्ण रूप सज्जा स्पर्धेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भारतीय संस्कृतीतील श्री गणेश आणि श्रीकृष्णाच्या यांचे स्थान आणि हिंदू जनमानसातील आस्था यांचे महत्व बालमनावर बिंबविण्याच्या उद्देशाने दोन कृष्णरूप सज्जा स्पर्धा आणि एक गणेश मूर्ती कार्यशाळा अशा तीन उपक्रमांचे आयोजन संस्कार भारतीच्या वतीने करण्यात आले होते. या तिन्ही उपक्रमांना पालक आणि बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रेशिमबाग येथील कार्यक्रमाला नगरसेविका मानसी नितीन सिमले, सुप्रसिद्ध उद्योजक जयंत खळतकर, सक्षमचे डॉ. मिलिंद हरदास, भाग संघचालक अशोक बुजोणे, किशोरजी धाराशिवकर, सुनीलजी काशीकर, प्रकाश एदलाबादकर, प्रकाश देशपांडे, ॲड. रमण सेनाड, आणि विदर्भ प्रांत सहमंत्री गजानन रानडे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. सौ.मीनल सांगोळे व श्रीमती ज्योत्स्ना करवडे यांनी स्पर्धा परीक्षण केले तसेच अभिजित मुळे यांनी सूत्र संचालन केले. तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कृष्णरूप सज्जा स्पर्धेत तब्बल ८३ मुला-मुलींनी सहभाग घेतला. विविध आकर्षक कृष्णरूपांमध्ये सजलेली बालके हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
कृष्णरूप सज्जेचा दुसरा कार्यक्रम जरीपटका येथील साधना सहकारी बँक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्कार भारतीचे अध्यक्ष विरेंद्र चांडक, साधना सहकारी बँकेचे अध्यक्ष घनश्याम कुकरेजा, विरेंद्र कुकरेजा नगरसेविका श्रीमती प्रमिला मथरानी उपस्थित होते.सदर भाग सहसंघसंचालक अतुलजी पिंगळे यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.या स्पर्धेत एकूण १६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परीक्षण श्रीमती जया कुपटकर आणि श्रीमती अनुराधा ठुसे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन मोहन गंगवानी यांनी तर सूत्र संचालन वंशिका जसावानी यांनी केले. प्रास्ताविक विनायक नंदेश्वर यांनी तर मुकुल मुळे यांनी आभारप्रदर्शन केले. मंचासमोर श्रीकांत बंगाले यांनी काढलेल्या रांगोळीतून बाळकृष्णांचे मनोहारी दर्शन घडत होते.
यासोबतच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा डिडोळकर भवन पांडे ले आउट येथील संस्कार भारतीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. महाकल्प आर्टिस्ट अकॅडमीचे उपाध्यक्ष शरद सहारे व सचिव श्री आशिष बोदडे संस्कार भारती अध्यक्ष विरेंद्र चांडक, कार्याध्यक्ष डॉ. मृणालिनी दस्तुरे यांच्या हस्ते कार्यशाळेचा शुभारंभ झाला. ज्येष्ठ चित्रकार नाना मिसाळ आणि मूर्तिकार शंतनु इंगळे यांनी सहभागींना मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन इशिता चौधरी यांनी तर सूत्रसंचालन अश्विनी अडोणी यांनी केले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोक जसवानी, ॲड. नीता सहारे, मनोज श्रोती, प्रदीप मारोडकर, श्रीकांत बंगाले, नीरज अडबे, सारा सचदेव, दीपा दर्रा, मोहित गोपलानी, संजय खनगई, विवेक रंगनाथ, सुधीर सांगोळे, संदीप वाघ कार्यरत होते. बालकांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांची गोडी निर्माण करणाऱ्या या तीनही उपक्रमांचे उपस्थित पालकांनी आणि नागरिकांनी कौतुक केले. अशा सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून भावी पिढीला आपल्या समृद्ध परंपरेची ओळख करून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


