अंतरवाली सराटी , रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी चिखलीकर यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले, “मी आधी मराठा समाजाचा एक घटक आहे. समाजाच्या न्याय्य हक्कासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. त्यांच्या या संघर्षाला माझा पूर्ण पाठिंबा असून, समाजहितार्थ सुरू असलेल्या या लढ्यात आपण शेवटपर्यंत समाजासोबत ठाम उभे राहू.” दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबतही आमदार चिखलीकर यांनी चिंता व्यक्त केली. “मनोजदादांची प्रकृती अत्यंत नाजूक बनली आहे. आम्ही त्यांना पाणी घेण्याचा आग्रह केला; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार मोहनराव हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पवार, शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे ढाकणीकर, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम, उत्तर जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील इंगळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष बालाजी शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष नेताजीराव भोसले, विधानसभा अध्यक्ष संतोष क्षीरसागर, माजी सभापती शंकरराव ढगे, पंचायत समितीचे माजी सदस्य गुलाब पाटील उबाळे, गुलाब पाटील कदम, भानुदास पाटील पवार, ज्ञानेश्वर उबाळे, बंडू पाटील काळे, भास्कर पाटील उबाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जाहीर पाठिंब्यामुळे लोहा-कंधार परिसरातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, मराठा समाजबांधवांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.


