लोहा, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी) : लोहा शहरात पतंजली योग समितीच्या वतीने मागील २७ वर्षांपासून अविरतपणे योग आणि सत्संगाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्यासोबतच संस्कारांची जपणूक करणारा हा उपक्रम तालुक्यासाठी आदर्श व प्रेरणादायी ठरत आहे.
लोहा शहरातील वीर माधवराव नळगे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परिसरात पतंजली योग समितीच्या वतीने दररोज सकाळी ५ ते ७ या वेळेत नियमित योग वर्ग घेतला जातो. शहरातील योग शिक्षक हरिभाऊ खोडके, विश्वंभरराव वाडेवाले (टेलर) व मोहन पवार हे योगसाधकांना योगासने व प्राणायामाचे प्रशिक्षण देतात. या योगवर्गात बालाजी जाधव, अशोक जगताप, शिवकांत स्वामी, रामराव जिंके, गोविंद फुलवरे, पांडुरंग मुलुकपाडे, नागेश दमकोंडवार यांच्यासह सुमारे २५ ते ३० योगसाधक सातत्याने सहभागी होतात. ‘योगातून निरोगी आरोग्य’ हा संदेश देत नागरिकांमध्ये योगाबाबत जनजागृती केली जाते.
दर रविवारी सकाळी ७ वाजता समितीच्या सर्व साधकांच्या वतीने सत्संगाचे आयोजन करण्यात येते. या वेळी शुद्ध आयुर्वेदिक खिचडी व आयुर्वेदिक कढी असा पौष्टिक व आरोग्यदायी प्रसाद दिला जातो. योग व सत्संगाचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पद्माकर पालीमकर, रेश्माजी दांगटे, देवराव वसमतकर यांच्यासह स्वयंसेवी योगसाधक विशेष परिश्रम घेत आहेत. दि. ६ सप्टेंबर रोजी झालेल्या रविवारच्या सत्संगासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष मोहन पाटील पवार हे दाते होते.
या सत्संग कार्यक्रमास लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक प्रतिनिधी राजेश बोडके, मधु पाटील पवार, कांता बिडवई, श्याम पाटील नळगे, राजू पाटील पवार, गजानन पवार, पत्रकार हनुमंत पांचाळ, सुनील चव्हाण, संजय कोटलवार यांच्यासह मोठ्या संख्येने योगसाधक व नागरिक उपस्थित होते.


