दुचाकी, कॅमेरा अन् लॅपटॉप चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीचा पर्दाफाश

तीन गुन्हे उघडकीस; १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नांदेड ( प्रतिनिधी)  : नांदेड शहर आणि परिसरात दुचाकी, कॅमेरा तसेच इतर मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय असलेल्या तीन तरुणांना ताब्यात घेतले. या कारवाईत तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ५ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड आणि त्यांच्या पथकाला काही संशयित तरुण विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून हिंगोली गेट ते कोर्टाच्या पाठीमागील रस्त्यावर फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी आंध्र समिती शाळेच्या भिंतीजवळ सापळा रचला. काही वेळातच निळ्या रंगाच्या दुचाकीवर तीन तरुण काळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पद अवस्थेत थांबलेले दिसले. पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कसून चौकशी केली असता चोरीच्या घटनांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे क्षितीज शरद कांबळे (२१), सुमेध गोपाळ लांबा (२३), दोघेही रा. प्रभातनगर, नांदेड आणि गोविंद मनोज खंडागळे (१८, रा. सम्राट अशोक नगर, नांदेड) अशी आहेत.

बंद दुकान फोडून कॅमेऱ्यांची चोरी

आरोपींनी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगर येथील बी. के. हॉलजवळील बंद दुकानाचे शटर फोडून दोन Sony कॅमेरे आणि एक लेन्स चोरल्याची कबुली दिली. या मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख १५ हजार रुपये असून तो पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला आहे.

घरासमोरून Activa लंपास

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरासमोर उभी असलेली निळ्या रंगाची Activa स्कूटी आरोपींनी चोरली होती. सुमारे ४० हजार रुपये किमतीची ही स्कूटी क्षितीज कांबळे याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात यश तारु हा आरोपीही सहभागी असल्याचे समोर आले असून तो सध्या फरार आहे.

पार्किंगमधूनही दुचाकी चोरी

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेदांत येथील राज पार्कच्या पार्किंगमधून Splendor मोटारसायकल चोरी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील मोटारसायकल यापूर्वीच पोलिसांनी जप्त केली आहे. याशिवाय आरोपी क्षितीज कांबळे याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा DELL Vostro 15 लॅपटॉपही जप्त करण्यात आला. हा लॅपटॉप पुण्यातील हिंजवडी परिसरातून चोरी केल्याची माहिती आरोपीने दिली आहे. जप्त केलेला मुद्देमाल संबंधित भाग्यनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला असून तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड तसेच पोलीस अंमलदार इमरान शेख, बालाजी कदम, प्रमोद जोंधळे, संतोष बेल्लुरोड, रवि हराळे, संदिप घोगरे आणि अमोल घेवारे यांच्या पथकाने केली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…