पिंपळे सौदागर, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या महोत्सवात श्रीकृष्ण जन्मोत्सव, कृष्ण-राधा रॅम्प वॉक, आकर्षक नृत्याविष्कार, शोभा टीमसोबत कृष्ण-राधेचे विशेष नृत्य, ५६ भोग अर्पण तसेच बालकृष्णासोबत दहीहंडी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘आला रे आला, गोविंदा आला’ आणि ‘गवळ्याच्या पोरींनो, जरा मडकी सांभाळा’ अशा पारंपरिक गजराने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. महिला, बालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा आनंद घेतला. भक्ती, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम या महोत्सवातून अनुभवायला मिळाला.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “श्रीकृष्ण जन्माष्टमी हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि आनंदाचा उत्सव आहे. भगवान श्रीकृष्णांच्या विचारांमधून प्रेम, सद्भावना, कर्तव्य आणि मानवतेचा संदेश मिळतो. हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता आपल्या संस्कृतीशी आणि परंपरांशी नव्या पिढीला जोडणारा ठरावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे.” या प्रसंगी उन्नती सखी मंच, उन्नती सोशल फाउंडेशनचे सदस्य तसेच पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते


