अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने वैष्णवी अनिलराव इंगळे यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात आचार्य पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यांनी ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथील प्रबळ ऍलर्जीनजन्य बुरशीजन्य वायुकणांमधील ऋतुनुसार होणारे बदल’ या विषयावर सखोल संशोधन करून आपला शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला.
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथील संशोधक विद्यार्थिनी असलेल्या वैष्णवी इंगळे यांनी आपल्या संशोधनामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील वातावरणात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या ऍलर्जीनजन्य बुरशीजन्य वायुकणांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. तीन वर्षे सातत्याने डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालयात वर्षभरातील विविध ऋतूंमध्ये या बुरशीजन्य घटकांचे प्रमाण, त्यामध्ये होणारे बदल, त्यांची विविधता तसेच मानवी आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. संशोधक पर्यवेक्षक प्राचार्य डॉ. दिलीप हांडे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी हा शोधप्रबंध संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे सादर केला. भविष्यातील आरोग्यविषयक उपाययोजनांसाठी त्यांच्या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो. त्यांच्या या संशोधनात्मक कार्याची दखल घेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने वैष्णवी इंगळे यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात आचार्य पदवी बहाल केली. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल शिक्षण, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वैष्णवी इंगळे यांच्या या यशामुळे अमरावतीच्या संशोधन क्षेत्राच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांनी आपल्या संशोधनाचे श्रेय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख यांच्यासह समस्त कार्यकारिणी, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन कोरपे, संशोधन मार्गदर्शक प्राचार्य डॉ. दिलीप हांडे, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ए. टी. देशमुख, विभागप्रमुख डॉ. दिनेश खेडकर, डॉ. गणेश हेडावू तसेच महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक गण, आई-वडील, पती गौरव इंगळे आणि समस्त मित्र परिवाराला दिले आहे. वैष्णवी इंगळे यांच्या यशाबद्दल अमरावती विद्यापीठ मित्र परिवार, शिव परिवार, युवक बिरादरी परिवार, मराठी पत्रकार संघ परिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


