नांदेड : अवैध अग्निशस्त्रांच्या विरोधात नांदेड पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने एका तरुणाला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह ताब्यात घेतले. विक्रीच्या उद्देशाने हे शस्त्र जवळ बाळगल्याचा आरोप असून, पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २ सप्टेंबर २०२६ रोजी अर्धापूर परिसरात अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुप्त बातमीदाराकडून वसमत फाटा ब्रिजखाली एक व्यक्ती गावठी पिस्तूल व काडतूस विक्रीसाठी घेऊन थांबली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात सापळा रचला. काही वेळात संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अमोल रमेश गिर्हे (वय २२, रा. पांगरा गडघे, ता. जालना, ह.मु. सरपंच नगर, मालेगाव, ता. अर्धापूर) असे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्याकडे सिल्वर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पिस्तुलाची अंदाजे किंमत ३५ हजार रुपये, तर काडतुसाची किंमत १ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौकशीत आणखी एका व्यक्तीचे नाव समोर
पोलिसांच्या चौकशीत अमोल गिर्हे याने सदर पिस्तूल आणि काडतूस हे नागेश गंगाधर हरबळे (रा. धामणगाव, ता. वसमत, जि. हिंगोली) याच्याकडून मिळाल्याचे सांगितले. हे शस्त्र विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याची माहितीही त्याने दिल्याचे पोलिसांनी नमूद केले. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४८५/२०२६ नुसार भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम ३/२५ व ७/२५ अंतर्गत अमोल गिर्हे आणि नागेश हरबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. अवैध अग्निशस्त्रांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी नांदेड पोलिसांकडून अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


