देवळापार, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख ) : देशातील युवक, शेतकरी आणि उद्योजकांना गोआधारित उत्पादने, सेंद्रिय शेती, स्वदेशी रोजगार तसेच गोशाळा व्यवस्थापनाचे व्यावहारिक प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने विश्व हिंदू परिषदेतर्फे ‘अखिल भारतीय विशेष प्रशिक्षण वर्ग’ देवळापार, नागपूर येथे सप्टेंबर २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत गोसेवा प्रमुख संतोष खामकर यांनी दिली. हे प्रशिक्षण वर्ग गो विज्ञान अनुसंधान केंद्र, देवळापार येथे होणार आहेत.
पाच दिवसांच्या निवासी प्रशिक्षण वर्गात गोआधारित विविध उत्पादनांच्या निर्मितीचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये मंजन निर्मिती व मंजन भट्टी संचालन, धूपबत्ती व मच्छर कॉईल निर्मिती, कापूर निर्मिती, अॅक्टिव्हेटेड कार्बन, अमृतपाणी व गोकोप अमृतम् तसेच गोमूत्र अर्क निर्मिती आदींचा समावेश आहे. याशिवाय कृषी व जैविक तंत्रज्ञान विभागात कीटकनाशक निर्मिती, गांडूळखत, कामधेनू कृषी तंत्र, तसेच बीज, भूमी व वायु संस्कार याबाबत प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. गोशाळा व्यवस्थापनासाठी गोमूत्र संकलन प्रक्रिया, प्रकल्प दर्शन, गोशाळा संचालन व व्यवस्थापन याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणादरम्यान पारंपरिक व आध्यात्मिक उपक्रमांतर्गत गोमाता आरती, पंचगव्य स्नान आणि पंचगव्य आयुर्वेदाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच गोबरापासून मूर्ती, दिवे व माळा तयार करण्याचे हस्तकला प्रशिक्षणही दिले जाणार आहे. रेडिएशन ज्योती/सोफीसची माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
चार टप्प्यांत प्रशिक्षणाचे आयोजन
२०२६ मधील प्रशिक्षणाच्या तारखा ९ ते १३ सप्टेंबर, २२ ते २६ ऑक्टोबर, २५ ते २९ नोव्हेंबर आणि २५ ते २९ डिसेंबर अशा चार टप्प्यांत निश्चित करण्यात आल्या आहेत. पाच दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी शुल्क १,००० रुपये असून निवास, भोजन व जलपान तसेच प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
प्रशिक्षणासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो व आधार कार्ड आवश्यक आहे. इच्छुकांनी दिलेल्या नोंदणी लिंकद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सनतकुमार गुप्ता (सचिव) – ९८९०८५९६७६ आणि नितीन मालवी (देवळापार संपर्क) – ९८९०७३६६९७ यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गोसेवकांनी या प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संतोष खामकर यांनी केले आहे.


