परभणी,निलेश कामतीकर ( जिल्हा प्रमुख ) : वसमत रस्त्यावरील विजय वाईनशॉपचे संचालक किशोर तलरेजा यांच्यावर रविवारी (दि. ३०) काही हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त सिंधी समाजबांधवांनी केली. यासंदर्भात सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना निवेदन साद करण्यात आले.
सिंधी समाजबांधवांनी पोलिस अधीक्षक कुमावत यांची भेट घेऊन रविवारी रात्री घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. दारू मोफत न दिल्याच्या कारणावरून काही जणांनी तलरेजा यांच्याशी हुज्जत घालत वाद घातल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर तलरेजा यांनी दुकान बंद करून बाहेर पडल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाची चावी हिसकावून घेतली. तलरेजा पायी जात असताना त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व रोख रक्कम हिसकावून घेतल्याचा आरोपही करण्यात आला.
हल्ल्यात तलरेजा यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांच्या डोक्याला सात टाके पडले असून उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. तसेच मान व पाठीवरही गंभीर मार लागल्याचे समाजबांधवांनी पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.


