तिवसा , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : कधी काळी शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीचे स्वप्न दाखविणारे संत्र्याचे पीक आज त्याच शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणत आहे. वर्षभर बागेची काळजी घेऊन, औषधांचा खर्च करून, मजूर लावून आणि पाण्याची व्यवस्था करून उभी केलेली संत्र्याची बाग डोळ्यांसमोर फळे गाळताना पाहण्याची वेळ तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादकांवर आली आहे. बदलते हवामान, वाढते तापमान, अनियमित पाऊस, वाढलेली आर्द्रता, एल निनोचा प्रभाव आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
तिवसा तालुक्यात अंदाजे २ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड असून आंबिया बहारातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा सुरुवातीपासूनच निसर्गाने संत्रा उत्पादकांची परीक्षा घेतली. उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने संत्रा फळांची नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात गळती झाली. त्यानंतर झाडांवर उरलेली परिपक्व फळे पिवळी पडू लागली. अनेक बागांमध्ये झाडांची पालवी कमी झाली असून फळांची वाढ आणि फुगवणही अपेक्षेप्रमाणे झालेली नाही.
फुलांनी बहरलेल्या बागा फळगळतीने ओसाड
यंदा आंबिया बहाराच्या सुरुवातीला संत्रा बागा फुलांनी अक्षरशः बहरून गेल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. कर्ज काढून, उधारीवर औषधे घेऊन आणि मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी बागेची निगा राखली. मात्र मार्च-एप्रिलमध्ये फळधारणा झाल्यानंतर अचानक मोठ्या प्रमाणात फळगळ सुरू झाली. काही बागांमध्ये तब्बल ६० टक्क्यांपर्यंत फळे गळून पडल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. झाडाखाली पडलेली असंख्य संत्री आणि झाडांवरच पिवळी पडलेली फळे पाहून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
झाडावर फळे, पण हातात पैसा नाही!
संत्रा बागेत फळे दिसत असली तरी त्यांची अपेक्षित फुगवण होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या उभी राहिली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून फळांच्या वाढीवर त्याचा परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी संत्री पिवळी पडून गळत आहेत, तर काही फळांवर काळे डाग पडल्याचेही दिसून येत आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे बागांमध्ये फांदीमर, डायबॅक, कॉलर रॉट आणि ब्राऊन रॉट यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे शेतकरी सांगतात. रोग नियंत्रणासाठी महागडी औषधे फवारूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढला आहे.
एकीकडे उत्पादनाचे नुकसान, दुसरीकडे बाजारभावाचा मार
संत्रा उत्पादकांसमोर केवळ हवामानाचे संकट नाही, तर बाजारपेठेचेही मोठे संकट आहे. निर्यातीवर परिणाम झाल्याने संत्र्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. उत्पादन कमी, खर्च जास्त आणि बाजारभाव कमी अशी तिहेरी कोंडी संत्रा उत्पादकांची झाली आहे. आरोग्यवर्धक फळ म्हणून संत्र्याला मोठी मागणी असणे अपेक्षित असतानाही बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दरात माल विकण्याची वेळ येत आहे. त्यामुळे बागेवर केलेला उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
बाग उभी करण्यासाठी लाखोंचा खर्च
संत्रा बाग ही एका हंगामात उभी होत नाही. रोपांची लागवड, सिंचन व्यवस्था, खते, औषध फवारणी, छाटणी, मजुरी, तण नियंत्रण आणि सातत्याने करावी लागणारी देखभाल यासाठी शेतकऱ्यांना मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. वर्षभर मेहनत करून बाग उभी केल्यानंतर नैसर्गिक संकटामुळे फळे गळून पडताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे अनेक संत्रा उत्पादक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
कापूसही संकटात; शेतकऱ्याची दुहेरी कोंडी
तिवसा तालुक्यात संत्र्यासोबतच कापूस उत्पादक शेतकरीही संकटाचा सामना करीत आहे. सुरुवातीला पावसाच्या अनिश्चिततेमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर कापूस पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला. आता काही भागात पिकाची पाने लालसर होऊन ‘लाल्या’सदृश समस्या दिसून येत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे एका बाजूला संत्रा बागा संकटात, तर दुसऱ्या बाजूला कापूस पिकावर संकट अशी शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे.
पंचनाम्याच्या कागदोपत्री प्रक्रियेत न अडकवता मदत द्या
नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पंचनामे, निकष आणि विविध कागदपत्रांच्या प्रक्रियेत अडकविले जाऊ नये, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्ष बागांमध्ये जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करावी आणि नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या संत्रा उत्पादकांना सरसकट मदत द्यावी, अशी अपेक्षा आहे. कुऱ्हा येथील एकजूट शेतकरी संघटनेने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपये सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
‘सरकारने आमची बाग वाचवावी, आशा वाचवावी’
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही केवळ पिकाची हानी नसून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. मुलांचे शिक्षण, घरखर्च, शेतीवरील कर्ज आणि पुढील हंगामाची तयारी या सगळ्यांचे गणित संत्रा उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे बागेतील प्रत्येक गळणारे फळ म्हणजे शेतकऱ्याच्या हातातून निसटणारा पैसा आहे.
आज झाडाखाली पडलेली संत्री पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. ज्या बागेकडे पाहून कुटुंबाच्या सुखाची स्वप्ने पाहिली, त्याच बागेत आज संकटाची सावली पसरली आहे. शासनाने या परिस्थितीकडे केवळ आकडेवारी म्हणून न पाहता शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया
वैभव वानखड़े, अध्यक्ष कांग्रेस कमिटी तिवसा
तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादकांच्या बागांची तातडीने पाहणी करून वस्तुनिष्ठ नुकसान निश्चित करावे, रोग व हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास करावा आणि पंचनाम्याच्या जाचक प्रक्रियेत न अडकविता हेक्टरी ६० हजार रुपयांची सरसकट मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.


