अकोले , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : GCМAS मुंबई यांच्या वतीने १६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन इंटरनॅशनल अबॅकस चॅम्पियनशिप परीक्षेत आय स्किल अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत अकॅडमीच्या तब्बल ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यामध्ये ४१ विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशिप मिळवली, तर ९ विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ३ विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक, तर एका विद्यार्थ्याने Consolation Prize मिळवून आपल्या कौशल्याची छाप पाडली. या स्पर्धेत कोतूळ येथील डॉ राहुल भुजबळ यांची कन्या समृद्धी राहुल भुजबळ हिने Abacus Level-6 मध्ये जागतिक चॅम्पियनशिप मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. तिने ६० गुणांचा पेपर अवघ्या ४ मिनिटे १२ सेकंदांत पूर्ण करून आपल्या वेगवान आणि अचूक गणितीय कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
समृद्धीच्या या यशाबद्दल आय स्किल अबॅकस अकॅडमीच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तिच्या यशामुळे पालक, शिक्षक आणि परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशासाठी संचालक तनुश पठाडे सर व संचालिका प्रियांका तनुश पठाडे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्याला योग्य दिशा देत त्यांना जागतिक स्तरावर चमकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अकॅडमीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


