अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : बीजं माता म्हणून ज्यांचा गौरव होतो. अनेकविध बियाणे पारंपारिक पद्धतीने जतन करणाऱ्या अकोले तालुक्यातील पद्मश्री राहीबाई पोरे यांनी राखी पौर्णिमे निमित्त मंत्री ना. चंद्रकांत दादांना गावरान बिजाची राखी भेट देत अनोखे रक्षा बंधन केले.
रक्षाबंधनाला नात्याबरोबरच मातीतल्या बियाण्यांच्या संवर्धनाचा संदेश; सैनिकांसाठीही पाठवल्या बीज राख्या.
रक्षाबंधन म्हटले की बहीण-भावाच्या प्रेमाचा पवित्र धागा डोळ्यांसमोर येतो. मात्र या नात्याला गावरान बियाण्यांच्या संवर्धनाची आणि राष्ट्रप्रेमाची अनोखी जोड देत पद्मश्री तथा ‘बीजमाता’ राहीबाई सोमा पोपेरेंनी यंदा चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी खास ‘बीज राखी’ तयार केली आहे. गावरान बियाण्यांपासून तयार केलेली ही राखी केवळ प्रेमाचा धागा नसून, शेतमातीशी असलेले नाते जपण्याचा अनोखा संदेश देणारी ठरली आहे.
राहीबाई पोपेरेंनी भात, नागली, वरई, तूर, मूग, उडीद, वाल, काकडी, भोपळा, घोसाळी यांसह विविध पारंपरिक गावरान बियाण्यांचा वापर करून आकर्षक बीज राख्या तयार केल्या आहेत. राखी बांधल्यानंतर या बियाण्यांची पेरणी करून पुन्हा नवीन पीक घेता येणार असल्याने या राखीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना राहीबाई आपला भाऊ मानतात, तर चंद्रकांत दादाही त्यांना भगिनीचे स्थान देतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी तयार केलेली ही बीज राखी म्हणजे आपुलकी, शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा त्रिवेणी संगम ठरला आहे.
‘राखीचा धागा मातीत रुजावा…’
गावरान बियाणे ही आपल्या शेतीची पारंपरिक संपत्ती आहे. आधुनिक शेतीच्या बदलत्या काळात अनेक पारंपरिक वाण लोप पावत असताना त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. याच उद्देशाने राहीबाई पोपेरेंनी आपल्या उपक्रमातून ‘राखी बांधा आणि बीज जपा’ असा सकारात्मक संदेश दिला आहे.
राहीबाईंच्या या उपक्रमाला आणखी एक भावनिक आणि राष्ट्रप्रेमाची किनार आहे. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांसाठीही त्यांनी बीज राख्या पाठवल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला भावंडांच्या नात्याचा सन्मान, तर दुसऱ्या बाजूला देशरक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता आणि गावरान बियाणे संवर्धनाचा संदेश असा व्यापक हेतू या उपक्रमामागे आहे.
नव्या पिढीलाही बीज संवर्धनाचा संस्कार
राहीबाईंची नातवंडे सायली आणि धनश्री यांनीही बीज राख्या तयार करण्यासाठी सहभाग घेतला. त्यामुळे हा उपक्रम केवळ एका पिढीपुरता मर्यादित न राहता पुढील पिढीकडे गावरान बियाण्यांचा वारसा सोपविण्याचा संस्कार ठरत आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने तयार झालेली ही अनोखी बीज राखी आजच्या काळात एक महत्त्वाचा संदेश देत आहे—‘भावाच्या मनगटावर राखी बांधा आणि शेतकऱ्याच्या मातीत बीज रुजवा.’ राहीबाई पोपेरेंचा हा उपक्रम पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


