बंदी बांधवांच्या मनगटावर राखी, डोळ्यांत भावनेचे अश्रू

रोटरी क्लबच्या भगिनींनी बांधली राखी; भावगीतांच्या सुरांनी कारागृहात फुलले आपुलकीचे वातावरण

चंद्रपूर, गौरव पराते (प्रतिनिधी ) : रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचा दिवस. याच भावनेला माणुसकीची जोड देत रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या महिला सदस्यांनी चंद्रपूर जिल्हा कारागृहातील बंदी बांधवांच्या मनगटावर राखी बांधली. या क्षणी अनेक बंदी बांधव भावूक झाले. कारागृहाच्या भिंतीआडही नात्यांची ऊब अनुभवायला मिळाल्याने वातावरण काही काळ भावनिक झाले होते.

चंद्रपूर जिल्हा कारागृहात रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर आणि इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटेरियन म्युझिशियन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन व भावगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे होते. प्रमुख अतिथी म्हणून इनरव्हिल क्लब ऑफ चंद्रपूरच्या माजी अध्यक्षा अर्चना उचके, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे माजी अध्यक्ष संदिप रामटेके, वरिष्ठ तुरुंगाधिकारी मिलिंद बनसोड, कमलाकर मिराशे, शिक्षक संजीव हटवादे यांच्यासह संस्थेचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर रोटरी क्लबच्या महिला सदस्यांनी बंदी बांधवांना राखी बांधली. राखी बांधण्याच्या या साध्या पण मनाला भिडणाऱ्या क्षणी अनेक बंदी बांधवांच्या डोळ्यांत भावनांचे प्रतिबिंब दिसून आले. सण-उत्सवांपासून दूर असलेल्या या बांधवांना काही क्षणांसाठी का होईना, आपुलकीच्या नात्याचा अनुभव मिळाला.

रक्षाबंधनाच्या या भावनिक वातावरणाला भावगीतांची सुरेल साथ मिळाली. इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटेरियन म्युझिशियनच्या कलाकारांनी विविध मराठी व हिंदी गीतांचा नजराणा सादर करत कारागृहातील वातावरणात आनंद आणि चैतन्य निर्माण केले. कार्यक्रमाची सुरुवात मनिषा पडगिलवार यांनी ‘सुरज की गर्मी से तपते हुए तन को मिल जाये तरुवर की छाया’ या गीताने केली. त्यानंतर डॉ. सुनील मलोजवार व जितेंद्र जनबंधु यांनी ‘तुझमे रब दिखता है, यारा मैं क्या करू’ हे गीत सादर केले. तसेच ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई’, ‘मेरे प्यार की उमर हो इतनी सनम’, ‘फुलों का तारों का, सबका कहना है’, ‘गजब का है दिन, सोचो जरा’ आदी गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. मनिषा पडगिलवार, वृशाली डेकाटे, पल्लवी चंदावार, निता जनबंध, ज्योती रामटेके, राजेश गन्नार्पवार, मनिष बोराडे, कमलाकर मिराशे, संदीप जोशी आदी कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने कार्यक्रमात रंग भरला.

अध्यक्षीय भाषणात कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी बंदी बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘हेही दिवस निघून जातील, चांगले दिवस येतील’, असा सकारात्मक संदेश देत त्यांनी बंदी बांधवांना धीर दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी मिलिंद बनसोड, कमलाकर मिराशे, संजीव हटवादे, महेंद्र हिरोळे, शिवशंकर खंडारे, नरेंद्र दशमवार, परेश जगनाडे, स्वाती सहारे, प्रगती बानेवार यांच्यासह कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्का ठाकरे यांनी केले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेल्या या उपक्रमातून कारागृहाच्या भिंतींपलीकडेही माणुसकी, आपुलकी आणि नात्यांची भावना जिवंत असल्याचा हृदयस्पर्शी संदेश मिळाला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…