अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधि ): रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या सुरक्षा जवानांसोबत रक्षाबंधन साजरे केले. यावेळी त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांना, आपल्या सुरक्षेसाठी कार्यरत अंगरक्षकांना तसेच महाराष्ट्र पोलीस विभागातील जवानांना राखी बांधून औक्षण केले आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून परस्परांच्या रक्षणाची, विश्वासाची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा सण आहे. याच भावनेतून नवनीत राणा यांनी सुरक्षा जवानांच्या मनगटावर राखी बांधत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला अभिवादन केले. “देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी जवान दिवस-रात्र तत्पर असतात. ऊन, वारा, पाऊस किंवा कोणतीही परिस्थिती असो, ते कर्तव्यापासून कधीही मागे हटत नाहीत. माझ्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या प्रत्येक सुरक्षा जवानाच्या समर्पणाला मी मनापासून सलाम करते,” अशी भावना नवनीत राणा यांनी व्यक्त केली. सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पार पाडताना अनेक जवानांना आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते. सण-उत्सवाच्या काळातही देशसेवा आणि नागरिकांची सुरक्षा यांना प्राधान्य देत ते कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या सेवेला सन्मान देण्याचा हा उपक्रम भावनिक ठरला.
यावेळी नवनीत राणा यांनी जवानांशी संवाद साधून त्यांच्या कर्तव्याबद्दल कौतुक व्यक्त केले. “रक्षण करणाऱ्या हातांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हीच खरी रक्षाबंधनाची भावना आहे,” असे त्यांनी सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणाबाबत बोलताना केंद्र व राज्य सरकारकडून महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारचा सातत्याने पुढाकार असल्याचेही नवनीत राणा यांनी नमूद केले.या प्रसंगी त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी कार्यरत जवानांसह देशातील प्रत्येक सैनिक, पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांच्या सेवेला अभिवादन केले. “या रक्षणकर्त्यांच्या त्याग आणि समर्पणामुळेच नागरिक सुरक्षितपणे आपले दैनंदिन जीवन जगू शकतात,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.


