नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद सुखदेव कवाडे यांची जुलै २०२६ महिन्यासाठी ‘पीआय ऑफ द मंथ’ म्हणून निवड करण्यात आली. लकडगंज विभाग, नागपूर शहर यांच्यातर्फे उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना अधिकृत प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.
जुलै महिन्यात कवाडे यांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यासह विविध प्रलंबित अर्जांचा वेळेत निपटारा केला. कुख्यात गुन्हेगारांविरोधात तडीपार प्रस्ताव तयार करणे, गुन्हेगारी इतिहासाची कागदपत्रे अद्ययावत ठेवणे तसेच फरार संशयितांचा शोध घेण्याची कार्यवाही करण्यात आली. वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त चौकशी अर्ज वेळेत पूर्ण करून त्यावर योग्य शेरा व अहवाल साद करण्यात आले. नागरिकांकडून प्राप्त जुने व नवीन अर्ज तपासून स्थानिक तक्रारी विहित मुदतीत निकाली काढण्यात आल्या. किरकोळ वादही समंजसपणे आणि कायदेशीर मार्गाने सोडविण्यात आले.
याशिवाय अवैध धंदे, जुगार आणि दारू विक्रीविरोधात छापे टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईदरम्यान जप्त मुद्देमाल नियमानुसार ताब्यात घेण्यात आला. CCTNS कामकाजातही उत्कृष्ट कामगिरी नोंदवत संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यात आला. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत लकडगंज विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद सुखदेव कवाडे यांना ‘जुलै २०२६ महिन्याचे सर्वोत्कृष्ट पीआय’ म्हणून प्रशंसापत्र प्रदान केले.


