कुर्तडी, रविन्द्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी नांदेड) : श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भक्ती, श्रद्धा आणि शिवनामस्मरणाची मंगल पर्वणी मानली जाते. याच पवित्र पर्वणीचे औचित्य साधून कुर्तडी, वारंगा येथील तीर्थक्षेत्र श्री भुवनेश्वर मंदिर परिसरात भाविकांसाठी दर्शनासोबतच आरोग्यसेवेचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. लायन्स प्रांत 3234 एच 2, लायन्स क्लब ऑफ नांदेड मिडटाऊन आणि डायबेटीस केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र, मधुमेह व थायरॉईड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात पंचक्रोशीतील महिला-पुरुष भाविकांसह एकूण २१५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११५ मधुमेह, ८७ उच्च रक्तदाब, ८ थायरॉईड आणि १८ लठ्ठपणाच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. सर्व रुग्णांना आहार व व्यायामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, ऑप्टोमेट्रिस्ट दृष्टिमितिज्ञ राजकुमार पवार आणि त्रिमुख क्षीरसागर यांनी २३० जणांची नेत्र तपासणी केली. त्यापैकी २२० जणांना चष्म्याचा नंबर काढून देण्यात आला, तर १० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. शिबिराचा ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक औषधोपचार आणि पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. तपासणीदरम्यान गरजूंना औषधोपचार करण्यात आले तसेच पुढील उपचारांसाठी आवश्यक सल्ला देण्यात आला. डॉ. जयश्री आढाव (बोडके), MBBS, D. Diabetology (Mumbai), डायबेटीस व थायरॉईड तज्ज्ञ, तसेच मधुमेह टीममधील वैजनाथ कोडंडे (PRO) आणि सय्यद सोहेल (लॅब) यांचे शिबिरास मार्गदर्शन लाभले.
या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून कुर्तडी-वारंगा परिसरातील नागरिकांना दैनंदिन आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी लायन्स क्लबच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. शिबिरास माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, रंजना सावंत, माजी प्रांतपाल जयेश ठक्कर, वर्षा ठक्कर, माजी प्रांतपाल प्रवीण अग्रवाल, करुणा अग्रवाल, उपप्रांतपाल योगेश जायसवाल, अमृता जायसवाल, सतीश सामते, मनीष माकन, रवि कडगे, स्मिता कडगे, बसवराज निरणे, बसवराज बिरदार, अमरसिंह चौव्हाण, सुनीता चौव्हाण, लक्ष्मण पपुलवाड, भगवान मानधने, राजेंद्र हुरणे, राजश्री हुरणे, संजय पाटणी, अनिल कासलीवाल, विश्वजित राठोड, लक्ष्मी राठोड, रमेश मिरजकर, पुष्पलता मिरजकर, साईनाथ रिसनगावकर, सपना रिसनगावकर, विजय होकर्णे, मनप्रीत कौर आणि विना चव्हाण आदींची उपस्थिती होती.
तसेच निवृत्त न्यायाधीश वर्षा ठक्कर, ‘प्रजावाणी’चे संपादक शंतनु डोईफोडे, वसंत मैया, नगरसेवक अमित चेहरा, राजेश तिवाडी, चंद्रकांत गव्हाणे आणि ऊल्का गव्हाणे यांचीही उपस्थिती लाभली. या आरोग्य शिबिराचे आयोजन लायन्स क्लब ऑफ नांदेड मिडटाऊनचे अध्यक्ष ला. सरताजसिंघ कंधारवाले, सचिव ला. विनायक चौहान, कोषाध्यक्ष ला. केदार मालपाणी, प्रोजेक्ट चेअरमन मीना सामते आणि कल्पना कासलीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
भंडारा व महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणी सोमवारचे औचित्य साधून एमडब्ल्यूबीसी सदस्य, एनर्जी ग्रुप आणि विसावा मॉर्निंग ग्रुप यांच्या वतीने भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी श्रावण मासानिमित्त परमपूज्य महंत रामेन्द्रपुरी महाराज यांचा राजेंद्र हुरणे, सतीश सामते व सर्व सदस्यांच्या वतीने फेटा व पवित्र वस्त्र प्रदान करून सन्मान करण्यात आला.श्रावणी सोमवारनिमित्त भुवनेश्वर मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण होते. भाविकांनी सहकुटुंब भुवनेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन शिवचरणी मनोभावे प्रार्थना केली. त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला.
भक्ती, आरोग्यसेवा आणि अन्नदान या तीनही सेवांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम श्रावणी सोमवारची पर्वणी अधिक सार्थ करणारा ठरला. धार्मिक श्रद्धेसोबतच ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या उपक्रमातून ‘सेवा हीच साधना’ या लायन्स क्लबच्या सेवाभावी कार्याची प्रचिती आली.


