मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेतील पात्र लाभार्थी निश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेनंतर सरकारने अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्यास सुरुवात केली आहे. नियमांचा भंग करून योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांसह सरकारी कर्मचाऱ्यांवरही नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकारकडून लाभार्थ्यांची पुनर्तपासणी करण्यात आली. सुरुवातीला अर्ज करताना महिलांना अडचणी येऊ नयेत, यासाठी कठोर तपासणी करण्यात आली नव्हती. मात्र, त्यानंतर योजनेच्या नियमांनुसार लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, नियमांच्या बाहेर जाऊन कोणालाही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. वारंवार संधी देऊनही ई-केवायसी पूर्ण न करणारे तसेच योजनेच्या पात्रता निकषांमध्ये न बसणारे लाभार्थी योजनेतून वगळण्यात आले आहेत. पडताळणीदरम्यान काही लाभार्थी आयकर भरणाऱ्या कुटुंबातील असल्याचेही समोर आले. नियमानुसार अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
पुरुष लाभार्थी आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई
पडताळणीमध्ये काही पुरुषांनी महिलांच्या नावाने किंवा स्वतःच्या नावाने योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले आहे. अशा प्रकरणांमध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही नियमबाह्य पद्धतीने योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
१ कोटी ६५ लाख महिला पात्र
ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेनंतर राज्यातील १ कोटी ६५ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण करून पात्रता कायम ठेवली आहे. या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारच्या या निर्णयामुळे योजनेचा लाभ खऱ्या पात्र महिलांपर्यंतच पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी आपली पात्रता आणि ई-केवायसीची स्थिती तपासून ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.


