कुंभवडे धबधब्यावर ३० ऑगस्टपर्यंत पर्यटकांना ‘नो एंट्री’; ग्रामस्थांचा कडक निर्णय

हुल्लडबाजी, वाहतूक कोंडी अन् धमक्यांमुळे गावकऱ्यांचा संताप

सिंधुदुर्ग : पावसाळ्यात पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कुंभवडे (बाबा) धबधब्यावर आता काही काळासाठी पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही. पर्यटकांच्या वाढत्या हुल्लडबाजीमुळे गावातील शांतता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर चौकुळ ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. ३० ऑगस्टपर्यंत चौकुळ गावातून धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून धबधब्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली होती. त्यासोबतच रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणे, वाहतूक कोंडी, दारू पिऊन गोंधळ घालणे आणि कचरा टाकण्याचे प्रकारही वाढल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या काही पर्यटकांमुळे स्थानिकांना मात्र त्रास सहन करावा लागत होता.

वाहतूक कोंडी सोडवताना धक्कादायक प्रकार

गेल्या रविवारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना काही पर्यटकांनी दंडुके आणि छोट्या कुऱ्हाडीसदृश वस्तू दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांकडे निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.

दारूच्या बाटल्या, कचरा अन् महिलांना त्रास

धबधब्याच्या परिसरात दारूच्या बाटल्या फोडणे, रस्त्यांवर कचरा टाकणे तसेच ये-जा करणाऱ्या महिलांना त्रास देण्याच्या घटनांमुळे ग्रामस्थ नाराज आहेत. पर्यटनामुळे गावाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होत असला, तरी स्थानिकांच्या सुरक्षिततेच्या किंमतीवर असे पर्यटन नको, अशी भूमिका आता ग्रामस्थांनी घेतली आहे.

३० ऑगस्टनंतर नियम आणखी कडक

सरपंच गुलाबराव गावडे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत पर्यटन व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ३० ऑगस्टनंतर धबधब्यावर पर्यटन सुरू ठेवायचे असल्यास पर्यटकांसाठी अधिक कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे कुंभवडे धबधब्यावरील पर्यटन आणि स्थानिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनीही स्थानिकांचा सन्मान आणि परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…