मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा अंदाज जारी केला असून, कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मंगळवारपासून (11 ऑगस्ट) महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात काही भागांत हलक्या सरी पडल्या असून, गेल्या 24 तासांत घाट परिसरात हलका ते मध्यम पाऊस नोंदवण्यात आला. पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत पावसाची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
कोकणात जोरदार पावसाचा अंदाज
अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे 15 ऑगस्टपर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबतच रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात. दरम्यान, 15 ऑगस्टनंतर कोकणातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 26 ते 31 ऑगस्टदरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात मंगळवार आणि बुधवारी पावसाच्या सरींचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मान्सूनला काही दिवसांचा ब्रेक का?
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होण्यामागे प्रशांत महासागर आणि बंगालच्या उपसागरातील वातावरणीय बदलांचा परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीनच्या किनारपट्टीवर धडकलेल्या डॉल्फिन चक्रीवादळामुळे भारतीय मान्सूनवर अप्रत्यक्ष परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अशा वातावरणीय हालचालींमुळे भारताकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. परिणामी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती काही काळ मंदावली आणि महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतल्याचे सांगितले जात आहे.
मात्र आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असल्याने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागांना पावसाची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विशेषतः घाट आणि सखल भागात प्रवास करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.


