शिरवळमध्ये भीषण अपघात; मावळातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू

कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध लेनमध्ये पलटी; ट्रकची धडक, दोघे जखमी

पुणे :  पुणे-सातारा महामार्गावरील (NH-48) शिरवळ येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कार पलटी होऊन विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात मावळ तालुक्यातील चार युवकांचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले आहेत.

शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर पहाटे सुमारे १.१० वाजता हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होती. शिरवळजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार प्रथम डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कार पलटी होऊन विरुद्ध लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. ट्रकची जोरदार धडक बसल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की घटनास्थळी काही काळ गोंधळाचे आणि हृदय पिळवटून टाकणारे दृश्य होते. या दुर्घटनेत वेदांत (१९, रा. कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (१९, रा. टाकवे), निखिल बाळू राऊत (२०, रा. कामशेत) यांच्यासह आणखी एका युवकाचा मृत्यू झाला आहे. दीक्षित दयानंद पुजारी (२०, रा. कामशेत) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०, रा. बहुर, कामशेत) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, सारोळा येथील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, ऐन तरुण वयात चार युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताबाबतची पुढील कायदेशीर कार्यवाही शिरवळ पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…