कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी दरवर्षी पावसाळ्यात महापूर म्हणजे मोठी चिंता बनते. नदीच्या पाण्याची पातळी वाढली की नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा पूरस्थितीची भीती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर आता महापुराच्या पाण्यालाच दुष्काळी भागासाठी वरदान बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कोल्हापुरात विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर आणि सांगली भागातील महापुराचे सुमारे ३५ ते ४० टीएमसी पाणी कालव्याद्वारे उजनी धरणापर्यंत नेण्याची योजना असल्याची माहिती दिली. उजनीमार्गे हे पाणी दुष्काळी तालुक्यांसह मराठवाड्यात पोहोचवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते. मात्र, अतिवृष्टीच्या काळात हेच पाणी महापुराचे रूप धारण करून मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. त्यामुळे पुराचे पाणी योग्य पद्धतीने वळवून त्याचा उपयोग दुष्काळी भागासाठी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
महापुरावर कायमस्वरूपी उपायाची अपेक्षा
कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिकांसाठी महापूर हा केवळ नैसर्गिक संकट नसून दरवर्षीच्या जीवनातील मोठा अडथळा ठरतो. शेती, व्यवसाय, वाहतूक आणि घरांचे नुकसान यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे महापुराचे पाणी नियंत्रित करून त्याचा उपयोग पाणीटंचाई असलेल्या भागासाठी करण्याच्या या योजनेकडे विशेष अपेक्षेने पाहिले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या भागात दरवर्षी सुमारे ८० टीएमसी पाणी महापुराच्या स्वरूपात उपलब्ध होते. त्यातील ३५ ते ४० टीएमसी पाणी कालव्याद्वारे उजनी धरणापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
७२ तासांच्या सरकारच्या काळात निर्णय
या प्रकल्पाची आठवण सांगताना फडणवीस यांनी आपल्या आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ७२ तासांच्या सरकारचा संदर्भ दिला. त्या काळात एमआरडीपी प्रकल्पाची फाइल आपल्यासमोर आली होती. तत्कालीन सचिव प्रवीण परदेशी यांनी जागतिक बँकेचे अधिकारी या प्रकल्पाबाबत चर्चेसाठी आल्याची माहिती दिल्यानंतर आपण आणि अजित पवार यांनी तत्काळ निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम?
दरम्यान, कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने बीसीसीआयकडे विनंती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींसाठी आवश्यक क्रीडा सुविधा विकसित करण्यावरही सरकार भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापुराच्या संकटातून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासोबतच कोल्हापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचे संकेत या घोषणांमधून मिळत आहेत. मात्र, महापुराचे पाणी प्रत्यक्षात किती आणि कधी वळवले जाणार, याकडे आता कोल्हापूर, सांगली आणि मराठवाड्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


