मुंबई : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर आला असताना नाशिकमधील रस्त्यांची दयनीय अवस्था प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असताना कोट्यवधी रुपये खर्च करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुंबईत शुक्रवारी (७ ऑगस्ट) झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत नाशिकमधील रस्त्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. ‘कोट्यवधी रुपये खर्च करूनही नाशिककरांचा रोष कमी होत नसेल, तर आपण कुठे चुकतोय याचे आत्मपरीक्षण करा. कारणे सांगू नका, नागरिकांच्या समस्या सोडवा,’ अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या.
खड्ड्यांमुळे पाच जणांचा मृत्यू
नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेत आला. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात तब्बल ३४ हजार ७३२ कोटी रुपयांची विकासकामे सुरू असताना शहरातील रस्त्यांची अवस्था अशी का आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. ‘सिंहस्थ तोंडावर आला आहे. आता शांत बसून चालणार नाही,’ असे सांगत अधिकाऱ्यांनी दालनात बसून कामकाज करण्याऐवजी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामांची पाहणी करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी असलेल्या अधिकारी आणि संबंधित यंत्रणांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या यंत्रणांची पुढील कामेही थांबविण्याचे आदेश त्यांनी दिले. येत्या महिनाभरात पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असून, त्या वेळी कामांमध्ये गुणात्मक सुधारणा दिसलीच पाहिजे, असा स्पष्ट इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये देशभरातून सुमारे १० ते १२ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांच्या सुविधा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिंहस्थाशी संबंधित सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासोबतच बाह्य रिंग रोडसह महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांना वेग देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश
– नाशिकमधील सर्व खड्डे तातडीने बुजवा.
– कारणे सांगण्याऐवजी नागरिकांच्या समस्या सोडवा.
– जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा.
– निष्काळजी यंत्रणांची पुढील कामे थांबवा.
– अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करावी.
– महिनाभरात रस्त्यांच्या कामात गुणवत्तापूर्ण बदल दिसला पाहिजे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रोजच्या प्रवासात नागरिकांना होणारा त्रास आणि वाढता रोष लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर नाशिकच्या रस्त्यांची परिस्थिती खरोखर बदलते का, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.


