गडचिरोली : विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता गडचिरोली जिल्ह्यालाही बसला आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने गडचिरोली, चामोर्शी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर असून नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्याने भरलेल्या रस्त्यांचा आणि पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागांना परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सखल भाग, पूरग्रस्त क्षेत्र आणि नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


