पिंपरी-चिंचवड : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पवना धरण ९६.६३ टक्के भरले असून आंद्रा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. वाढत्या पाणीसाठ्यामुळे पवना, आंद्रा, वडिवळे आणि कासारसाई धरणांतून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे एका दिवसात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. सध्या धरणात ८.२२ टीएमसी पाणीसाठा असून साठा सातत्याने वाढत आहे. पवना धरणातून ६,८०० क्युसेक, आंद्रा धरणातून १,५७२ क्युसेक, वडिवळे धरणातून ३,५९२ क्युसेक आणि कासारसाई धरणातून ७५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, पवना नदीवरील कोथुर्णे पूल पाण्याखाली गेल्याने कोथुर्णे, वारू आणि मळवंडी ठुले या तीन गावांचा संपर्क तात्पुरता तुटला आहे. परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि नदीपात्राजवळ जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही तासांत विसर्गात बदल होण्याची शक्यता असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


