मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या लागू असलेली १० टक्के पाणीकपात लवकरच हटवली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) माहितीनुसार, सोमवार (२७ जुलै) रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सातही जलाशयांमध्ये एकूण १२,७९,५३४ दशलक्ष लिटर, म्हणजेच ८८.४० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या २४ तासांत जलाशयांमधील पाणीसाठ्यात २.२२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची चिंता काहीशी कमी झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ७ ते ८ दिवस पावसाची स्थिती आणि जलाशयांतील पाण्याची पातळी बारकाईने पाहिली जाणार आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाणीकपात कायम ठेवायची की हटवायची, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहून जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यास १५ ऑगस्टपूर्वीच १० टक्के पाणीकपात रद्द होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जलाशयांतील सध्याचा पाणीसाठा
विहार, तुळशी आणि मोडकसागर जलाशय शंभर टक्के भरले आहेत.
तानसा – ९८.९३%
मध्य वैतरणा – ९१.२१%
भातसा – ८६.८६%
वरची वैतरणा – ७५.७६%
गेल्या २४ तासांत मध्य वैतरणा जलाशयात १.९० मीटरची सर्वाधिक पाणीपातळी वाढ नोंदवली गेली. त्यानंतर भातसा, वरची वैतरणा आणि तानसा जलाशयांमध्येही पाण्याची पातळी वाढली आहे. मुंबईतील पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत जलाशय आणखी भरतील आणि त्यानंतर मुंबईकरांची पाणीकपातीची चिंता पूर्णपणे दूर होण्याची शक्यता आहे.


