मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मालाड पूर्व येथील स्वामी विवेकानंद हॉलमध्ये ‘अंगण मिलन सेवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या वतीने ३२ अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला.
अंगणवाडी सेविका बालकांचे पोषण, आरोग्य, संगोपन आणि सर्वांगीण विकासासाठी तळागाळात सातत्याने महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. त्यांच्या समर्पित आणि सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून सेवा, समर्पण आणि समाजहिताची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. याच भावनेतून अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास नगरसेवक सिद्धार्थ शर्मा, नगरसेवक संजय कांबळे, महिला मोर्चा अध्यक्षा संगीता राणे, महामंत्री ज्योती शहा, मंडळ महामंत्री विजय भोसले, सुरेंद्र यादव यांच्यासह अंगणवाडी सेविका, कर्मचारी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून अंगणवाडी सेविकांच्या सेवेला सन्मानाची पावती देण्यात आली.


