नांदेड (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री महावतार बाबाजी यांचे कृपाशिष्य जयेंद्र बरारा व प्राचार्या डॉ. अमन बरारा यांच्या पुढाकाराने आणि गुरु राजेंद्र सिंह यांच्या प्रेरणेतून सुयोग किड्झ अँड इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी गरजू नागरिकांना अन्नदान केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक संवेदनशीलता, सेवाभाव आणि गरजूंना मदत करण्याचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून अनुभवता आले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अन्नदानाचे महत्त्व समजावून सांगत समाजातील गरजू घटकांप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे आणि गरजूंना मदतीचा हात देण्याची वृत्ती विकसित करणे, हा या मूल्यशिक्षणपर उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे प्राचार्या डॉ. अमन बरारा यांनी सांगितले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये माणुसकी, करुणा आणि सेवाभाव रुजविणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.


