पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या अलंकारात सुवर्णवैभवाची भर पडली आहे. घटस्थापनेच्या मंगलदिनी देवीला तब्बल दोन किलो वजनाचा रत्नजडित सोन्याचा मुकुट परिधान करण्यात आला. कलात्मक नक्षीकाम आणि आकर्षक मौल्यवान रत्नांनी सजलेला हा मुकुट देवीच्या सौंदर्यात अधिक भर घालणारा ठरत आहे. नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत भाविकांना देवीच्या या लोभस आणि सुवर्णतेजाने झळाळणाऱ्या रूपाचे दर्शन घेता येणार आहे.
मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुकुटामध्ये श्री लक्ष्मी-विष्णू गरुडावर विराजमान असलेले मनोहारी रूप साकारण्यात आले आहे. यासोबतच अष्टलक्ष्मींच्या विविध स्वरूपांचे अत्यंत बारकाईने आणि कलात्मक पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. राठौड ज्वेलर्सचे संजय राठोड यांनी या मुकुटाची निर्मिती केली आहे.
मुकुटामध्ये वापरण्यात आलेली विविध प्रकारची मौल्यवान रत्ने हे त्याचे विशेष आकर्षण आहे. प्रत्येक देवस्वरूपाच्या भावमुद्रा, चेहऱ्यावरील भाव आणि सूक्ष्म तपशील स्वतंत्रपणे अधोरेखित करण्यात आले आहेत. त्यामुळे ही कलाकृती अधिक जिवंत, आकर्षक आणि देखणी भासत आहे.


