सात दिवसांनंतर पालकमंत्री बावनकुळे रुग्णालयात; दुर्घटनाग्रस्त एनआयसीयूची पाहणी

बाधित नवजात बालकांच्या प्रकृतीची घेतली विचारपूस; पालकांना दिला धीर, परिचारकांशी साधला संवाद

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी ) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) २४ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्घटनेनंतर तब्बल सात दिवसांनी राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (पीडीएमसी), मुरके हॉस्पिटल तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त एनआयसीयू कक्षाची पाहणी केली.

पीडीएमसी आणि मुरके हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या नवजात बालकांच्या प्रकृतीची माहिती पालकमंत्र्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली. काही बालकांची प्रकृती धोक्याबाहेर आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. उर्वरित बालकांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

पालकमंत्री बावनकुळे यांनी उपचाराधीन बालकांच्या माता-पित्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. चिंतेत असलेल्या पालकांना धीर देत राज्य शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. बालकांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये आणि आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

दुर्घटनाग्रस्त एनआयसीयूची पाहणी

जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त एनआयसीयू कक्षाची पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी व वरिष्ठ डॉक्टरांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. दुर्घटनेचे कारण, त्यावेळची रुग्णालयातील परिस्थिती आणि नवजात बालकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली. दुर्घटनेच्या वेळी जीवाची पर्वा न करता नवजात बालकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या परिचारकांशीही त्यांनी संवाद साधला. परिचारकांकडून दुर्घटनेच्या वेळी घडलेल्या घटनाक्रमाची माहिती घेतली.

सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देश

भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. अग्निसुरक्षा यंत्रणा, विद्युत व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीतील बचावकार्य तसेच रुग्णालयातील इतर सुरक्षा उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, दुर्घटनेनंतर सात दिवसांनी पालकमंत्र्यांनी रुग्णालयाला दिलेल्या भेटीकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुर्घटनेची चौकशी सुरू असून चौकशी अहवालानंतर दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि संबंधितांची जबाबदारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौकशी अहवालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या पाहणी दौऱ्यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त मंगेश गोंदावले, पोलीस आयुक्त राकेश ओला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…