अहिल्यानगर , राधेश्याम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख ) : उत्तम प्रतिसाद, बुक माय शोवर ९.५ रेटिंग आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळूनही ‘समर्थ’ या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रात पुरेशा स्क्रीन मिळत नसल्याची खंत चित्रपटाचे निर्माते व प्रसिद्ध राम कथा वाचक रवींद्र पाठक यांनी व्यक्त केली आहे. हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांना प्राइम टाइम देताना मराठी चित्रपटांना मात्र दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘समर्थ’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीपासूनच समीक्षकांची उत्तम प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटाची चर्चा कायम राहिली. मात्र, शोच्या समान संधी न मिळाल्याने चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे निर्माते पाठक यांनी सांगितले.
प्रदर्शनाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात १०९ स्क्रीनवर असलेला ‘समर्थ’ दुसऱ्या आठवड्यात ६१, तर तिसऱ्या आठवड्यात काही मोजक्या स्क्रीनवर आणण्यात आला. विशेष म्हणजे, उपलब्ध स्क्रीनपैकी काही ठिकाणी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही स्क्रीन कमी करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांमध्येही ‘समर्थ’ची उत्सुकता
‘समर्थ’ हा केवळ आध्यात्मिक किंवा मनोरंजनात्मक चित्रपट नसून समर्थ रामदास यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे पाठक यांनी सांगितले. सुमारे चार कोटी रुपये खर्चून बनविलेल्या या चित्रपटात मराठीतील आघाडीचे कलाकार सहभागी झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात चित्रपट दाखविला जात असून, आतापर्यंत सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी ‘समर्थ’ पाहिला आहे. विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता आणखी हजारो विद्यार्थी चित्रपट पाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, त्यांच्यासाठी पुरेसे शो उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे.
‘समर्थ’चा संदेश अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा
“‘समर्थ’ ही केवळ अध्यात्मावर भाष्य करणारी फिल्म नाही; समर्थांच्या विचारांचा आजच्या आयुष्यात कसा उपयोग होऊ शकतो, हे सांगणारी कथा आहे,” असे रवींद्र पाठक यांनी स्पष्ट केले. चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली असून दिग्दर्शन योगेश फुलफगार यांनी केले आहे. भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जेमेनिस, ईशा केसकर, हार्दिक जोशी आदी कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
दरम्यान, ‘समर्थ’ चित्रपटाला पुरेशा स्क्रीन मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना अनेक निवेदने देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, अशी नाराजी पाठक यांनी व्यक्त केली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी संवाद साधून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले; मात्र प्रत्यक्ष कार्यवाही अद्याप झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. “मराठी चित्रपटांना किमान एकदा ४०० स्क्रीन देऊन संधी द्या. चित्रपट आवडला नाही तर निर्णय प्रेक्षकांचा; पण तो पाहण्याची संधी तरी द्या.”


