नांदेड , रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता तसेच पंजाब आणि मराठवाडा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त व सुलभ रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर रेल्वेने अमृतसर-हजूर साहेब नांदेड-अमृतसर दरम्यान विशेष आरक्षित रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी ‘ट्रेन ऑन डिमांड’ या स्वरूपात चालवण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 04642 अमृतसर-हजूर साहेब नांदेड विशेष ही गाडी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सोमवारी रात्री २१.१० वाजता अमृतसर येथून सुटेल. अमृतसर, बियास, जालंधर सिटी, फगवाडा, लुधियाना, सरहिंद, राजपुरा, अंबाला कॅंट., पानिपत, दिल्ली सफदरजंग, मथुरा, आग्रा कॅंट., वाल्हेर, वीरांगणा लक्ष्मीबाई झांसी, बिना, भोपाल, इटारसी, खंडवा, भुसावळ, मनमाड, नगरसूल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि पूर्णा मार्गे ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता हजूर साहेब नांदेड येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 04641 हजूर साहेब नांदेड-अमृतसर विशेष ही गाडी ६ सप्टेंबर २०२६ रोजी रविवारी रात्री २१.०० वाजता हजूर साहेब नांदेड येथून सुटेल. वरील मार्गे प्रवास करत ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता अमृतसर येथे पोहोचणार आहे.
ही विशेष गाडी पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांना जोडणार आहे. त्यामुळे हजूर साहेब नांदेड येथे येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांसह इतर प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. या विशेष गाडीत एकूण २४ डबे असतील. त्यामध्ये द्वितीय श्रेणी (स्लीपर)चे १८ डबे, जनरलचे ४ डबे आणि २ एस.एल.आर. डब्यांचा समावेश आहे. ही गाडी आरक्षित विशेष गाडी म्हणून चालवण्यात येणार असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी आवश्यक आरक्षण करूनच प्रवास करावा. तसेच प्रवासापूर्वी गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि आरक्षणाची माहिती रेल्वेच्या अधिकृत माध्यमातून तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


