सत्याच्या रक्षणासाठीही झुंज द्यावी लागली: डॉ. पुरोहित

पुणे. देशसेवेचे व्रत घेऊन लष्करात दाखल झालेल्या अधिकाऱ्याला देशद्रोही ठरविणे ही अत्यंत वेदनादायक आणि आत्मसन्मानाला धक्का देणारी बाब आहे. कर्नल प्रसाद पुरोहित यांना मालेगाव स्फोट प्रकरणात झालेल्या आरोपांमुळे कुटुंबाला मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले. मात्र कुटुंबीय, समाजातील सहृदयी व्यक्ती आणि लष्करातील सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठबळामुळे या कठीण काळातून मार्ग काढता आला. सत्यावर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून संघर्ष केला, तर मार्ग नक्की सापडतो, असे प्रतिपादन डॉ. अपर्णा पुरोहित यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अरण्येश्वर शाखेच्या वतीने आयोजित लक्ष्मीकांत जांभोरकर स्मृती व्याख्यानमालेचे दहावे पुष्प रविवारी (दि. १ नोव्हेंबर २०२६) सहकारनगर येथे पार पडले. ‘मालेगाव स्फोट : लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीची संघर्षगाथा’ या विषयावर डॉ. अपर्णा पुरोहित यांनी आपले अनुभव मांडले. यावेळी पद्मावती नगराचे संघचालक अविनाश धोमकर उपस्थित होते.
कर्नल प्रसाद पुरोहित यांनी देशभक्तीच्या भावनेतून भारतीय लष्करात प्रवेश केला. आर्मी इंटेलिजन्स विभागात कार्यरत असताना त्यांनी बनावट चलनाचे रॅकेट, मुंबईच्या सागरी सुरक्षेला असलेले धोके अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर काम केले. मालेगाव स्फोट प्रकरणाचा अहवालही त्यांनी सादर केला होता. मात्र, पुढे याच प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे पुरोहित कुटुंबावर मोठे संकट कोसळल्याचे डॉ. अपर्णा यांनी सांगितले.
या कठीण काळात लष्करी नियमांचे उल्लंघन करून पतीला अटक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा, मुलांचे संगोपन, आर्थिक जबाबदाऱ्या आणि पतीच्या न्यायालयीन लढ्याची धुरा अशा अनेक आघाड्यांवर एकाच वेळी संघर्ष करावा लागला. मात्र, वकील, काही लष्करी अधिकारी आणि हितचिंतकांनी केलेल्या मदतीमुळे लढण्याचे बळ मिळाले. आईकडून मिळालेली अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवणही या काळात उपयोगी पडल्याचे त्यांनी नमूद केले.
तत्कालीन संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या सहकार्याच्या आठवणीही डॉ. पुरोहित यांनी यावेळी सांगितल्या. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आलेल्या अडचणी आणि कुटुंबाने सोसलेल्या मानसिक त्रासाचे वर्णन करताना उपस्थित श्रोते भावूक झाले. आपली व्यक्ती सत्याच्या बाजूने असेल, तर तिच्या न्यायासाठी कोणत्याही परिस्थितीशी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
देशभक्त कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या समर्थनार्थ समाजाने अधिक ठामपणे आवाज उठवायला हवा होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. संकटाच्या काळात मिळालेल्या कौटुंबिक आणि सामाजिक पाठबळाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकला कानडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘अनादि मी अनंत मी’ हे गीत सादर करून केली. रजनी वनारसे यांनी सूत्रसंचालन केले, तर संजीव खळदकर यांनी आभार मानले. डॉ. अपर्णा पुरोहित यांच्या संघर्षमय अनुभवांना दाद देण्यासाठी उपस्थित श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा सन्मान केला. ज्येष्ठ गायिका स्वरदा गोडबोले यांनी सादर केलेल्या संपूर्ण ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

SUPER 25 MARATHI HEADLINES 7 NOVEMBER @12 PM

रोटरी क्लब अहिल्यानगरचा ‘स्वर दीपावली’ कार्यक्रम दिमाखात संपन्न!

अहिल्यानगर,राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यावसायिक युगात माणसामाणसांमधील दुरावा वाढत असताना, रोटरी क्लब अहिल्यानगरच्या वतीने आयोजित ‘स्वर दीपावली’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आपलेपणा, जिव्हाळा आणि माणुसकीचा अनोखा अनुभव देणारा…