कोतूळ, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतूळ येथे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीनिमित्त प्राचीन व जागृत श्री वरदविनायक देवस्थानात सोमवारी भक्तीचा महासागर उसळला. पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोतूळसह अकोले तालुक्यातील विविध गावांतून महिला, पुरुष व कुटुंबांसह भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाले. दिवसभर मंदिर परिसरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
पहाटेच्या थंड वातावरणातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भूपाळी वादनाने दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर शेखर शेटे यांच्या हस्ते श्री वरदविनायकाची विधिवत महापूजा करण्यात आली. महापूजेनंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनास खुले करण्यात आले. श्रींच्या चरणी दुर्वा, फुले, नारळ व मोदक अर्पण करून भाविकांनी सुख-समृद्धी, आरोग्य व संकट निवारणासाठी प्रार्थना केली.
भाविकांसाठी विविध सुविधा
संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याचे पाणी, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष तसेच प्रसाद वाटपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दुपारनंतर देवस्थानच्या वतीने भाविकांना शाबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
अथर्वशीर्ष पठणाने वातावरण भारावले
संध्याकाळी मंदिर परिसरात सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले. विद्या परशुरामी, सविता घाटकर, प्रज्ञा भाटे, द्वारका पोखरकर, वृषाली समुद्र यांनी अथर्वशीर्ष पठणाचे नेतृत्व केले. यावेळी महिला व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सामुदायिक पठणाच्या मंगलमय स्वरांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. संध्याकाळची आरती लिलाबाई व श्री पुंजीराम खरात यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी देवस्थानच्या वतीने प्रा. संभाजी पोखरकर यांनी त्यांचा सन्मान केला.
रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी
यावेळी प्रदिप भाटे, राजेंद्र देशमुख, संभाजी पोखरकर, वासुदेव साळुंके, अजित आरोटे, विशाल बोऱ्हाडे, देवानंद पोखरकर, अनिल खरात, दीपक राऊत, विनय समुद्र, सागर सोनुले, सचिन पाटील, अमोल आभाळे यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी, सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाल्याने कोतूळ येथील श्री वरदविनायक मंदिर परिसराला भक्तीमय यात्रेचे स्वरूप आले होते. पहाटेपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा सुंदर संगम घडवत संकष्टी चतुर्थी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली.


