कोल्हापूर, राजन शेळके (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या चरणी भाविकांनी भरभरून दान अर्पण केले आहे. नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत सोनं, चांदी आणि रोख रकमेच्या स्वरूपात एक कोटी रुपयांहून अधिक दान मंदिराला प्राप्त झाले आहे. अद्याप मंदिरातील काही दानपेट्यांची मोजणी बाकी असल्याने दानाचा एकूण आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांनी देवीच्या चरणी सोन्या-चांदीसह रोख रक्कम अर्पण केली. उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत २० लाख ३० हजार रुपये किमतीचे १०३ ग्रॅम सोने, ४४ लाख ३८ हजार रुपये किमतीची १६ किलो चांदी आणि ३६ लाख ७५ हजार रुपयांची रोकड दानस्वरूपात प्राप्त झाली आहे.
याशिवाय, भाविकांकडून ऑनलाइन दानातही वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिरातील उर्वरित दानपेट्यांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर दानाचा अंतिम आकडा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या चरणी अर्पण झालेल्या दानाच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


