तिवसा, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : शेतकऱ्यांच्या व्यथा, दुष्काळाची झळ, पिकांचे होत असलेले नुकसान आणि प्रशासनाच्या दारात वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मंगळवारी फत्तेपूर (शिवणगाव) ते तिवसा तहसील कार्यालय अशी तब्बल १३ किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली. प्रहारचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख आणि योगेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत शेकडो शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवक सहभागी झाले होते.
स्वर्गीय मनोज पांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर हातात मागण्यांचे फलक, ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची वेदना घेऊन निघालेल्या या मूक मोर्चाने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिवसा तालुक्यासह अमरावती जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकरी व शेतमजुरांना तातडीची आर्थिक मदत द्यावी, गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेचे पाणी फत्तेपूर-शिवणगाव परिसरातील कोरडवाहू भागात पोहोचवावे, शेतमालाला हमीभाव द्यावा, वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीवर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
तसेच स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती थांबविणे, शेतीच्या वीजपुरवठ्यातील अडचणी दूर करणे, डी.बी. बॉक्स व ए.बी. स्विचची दुरुस्ती करणे, पीकविम्याच्या जाचक अटी रद्द करणे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देणे, या मागण्यांचाही निवेदनात समावेश होता. पदयात्रा गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी पोहोचली. दर्शन घेतल्यानंतर पदयात्रा तिवसा तहसील कार्यालयावर धडकली. तेथे प्रशासनाला निवेदन देऊन मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
संजय देशमुख यांची प्रतिक्रिया
“आज शेतकरी अक्षरशः संकटाच्या विळख्यात सापडला आहे. पाऊस नाही, उत्पादन नाही, बाजारभाव नाही आणि शासनाच्या मदतीचीही प्रतीक्षा कायम आहे. स्वर्गीय मनोज पांडे यांच्यासारख्या शेतकरी कुटुंबांवर आलेले दुःख ही केवळ एका घराची शोकांतिका नसून संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेच्या वेदनेचे प्रतीक आहे. आम्ही कोणत्याही राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या अश्रूंना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरलो आहोत. शासनाने आता कागदोपत्री आश्वासने न देता प्रत्यक्ष मदतीचे निर्णय घ्यावेत. शेतकऱ्याचा जीव, त्याची शेती आणि त्याचे भविष्य वाचविण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर ग्रामीण भागातील परिस्थिती अधिक गंभीर होईल,” असे मत प्रहारचे नेते संजय देशमुख यांनी व्यक्त केले.
या पदयात्रेत सुरेंद्र भिवगडे, बाला देशमुख, योगेश भुसारी, अंकुश गायकवाड, मोहन आवारे, निलेश राऊत, पिंटू गाडे, समीर लांडगे, गजू कडू, कपिल उमप, इर्शाद बेग, हेमंत तायडे, शरद खारोडे, सतीश गांवडे, दयाराम राठोड़ यांच्यासह शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.


