विद्यार्थ्यांना आवडीच्या विषयाचे शिक्षण घेण्यासाठी मुक्त व अनुकूल वातावरण गरजेचे : नेहाताई बेलसरे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण संस्थांनी एकत्र काम करण्याचे आवाहन

सांगली, राधेशाम कुलकर्णी ( प्रतिनिधी ) :  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अधिक गतिमान व प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षण संस्थांनी केवळ आपल्या संस्थेपुरते मर्यादित न राहता समाजाच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शिका नेहाताई बेलसरे यांनी केले.

विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, कोल्हापूर विभाग यांच्या वतीने सांगली येथील शिक्षण संस्थेच्या बी.एड. महाविद्यालयाच्या सभागृहात सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील शिक्षण संस्थांच्या संचालक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शैक्षणिक तज्ज्ञ तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या सहभागातून संचालक परिषद आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक श्री. नानासाहेब जाधव होते. यावेळी विद्याभारती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. अरुणराव कुलकर्णी, उपाध्यक्ष जान्हवीताई, सहमंत्री श्री. दादासाहेब काजळे, कोल्हापूर विभाग मंत्री श्री. महादेव जोगळेकर, पूर्वमंत्री श्री. मोहनराव कुलकर्णी तसेच प्रमुख मार्गदर्शिका नेहाताई बेलसरे उपस्थित होत्या. नेहाताई बेलसरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. भारतीय शिक्षणाला स्वतःची दिशा आणि भारतीय चिंतनाधिष्ठित स्वरूप देण्याच्या दृष्टीने हे धोरण महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. बालकेंद्रित, क्रियाधारित आणि अनुभवाधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांचे शिक्षण घेण्यासाठी मुक्त व अनुकूल शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले पाहिजे. विविध शाळा, शाळा संकुले आणि शिक्षण संस्थांनी परस्पर सहकार्याने काम करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. वयाच्या ३ ते ८ वर्षांतील बालकांच्या विकासाकडे विशेष लक्ष देऊन पायाभूत शिक्षणाचा भक्कम पाया निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा म्हणजे केवळ बंदिस्त इमारत नसून विद्यार्थ्यांना मोकळे, आनंददायी आणि अनुभवाधारित शिक्षणाचे वातावरण मिळाले पाहिजे. शाळांमध्ये खेळाचे मैदान व विविध उपक्रमांसाठी पुरेशी मोकळी जागा असणे आवश्यक असल्याचे बेलसरे यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून कौशल्यविकास, स्वावलंबन आणि देशभक्तीची भावना विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित न ठेवता कौशल्ये, संस्कार आणि मूल्यांची जोड देऊन चांगला नागरिक घडविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालक प्रबोधनाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विशेष महत्त्व देण्यात आले असून, पालकांची कौशल्ये, अनुभव आणि सहभागाचा शिक्षण प्रक्रियेत प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘विद्यांजली’ पोर्टलच्या माध्यमातून शाळांना उपलब्ध होणाऱ्या सेवा व सुविधांचा उपयोग करून सामाजिक सहभागातून शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्याचेही त्यांनी सांगितले.

‘केवळ माझी शाळा नव्हे, समाजाचा विचार करा’

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. नानासाहेब जाधव यांनी शिक्षण संस्थांच्या संचालकांनी केवळ आपल्या संस्थेचा विचार न करता संपूर्ण समाजाच्या शैक्षणिक विकासाचा विचार करावा, असे आवाहन केले. विद्याभारती भारतीय चिंतनावर आधारित शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून १९५२ पासून तिचे कार्य सुरू आहे. देशभरात सरस्वती विद्यालयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक कार्य सुरू असून लाखो विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीतही विद्याभारतीचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याने शिक्षण संस्थांनी विद्याभारतीशी सहकार्य व संलग्नता वाढवावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सौ. पौर्णिमाताई पोतदार व सौ. पौर्णिमाताई कुलकर्णी यांनी विद्याभारती पद्धतीची वंदना सादर केली. संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीराम कुलकर्णी यांनी मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजूताई छत्रे यांनी केले, तर श्री. माधव छत्रे यांनी आभार मानले. समारोपावेळी उपस्थितांनी एकमेकांना राखी बांधून सामाजिक रक्षाबंधनाचा उपक्रम साजरा केला. सौ. वैशाली जोगळेकर यांनी शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता केली. परिषदेसाठी २२ संचालकांसह ४५ शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक असे एकूण १२७ प्रतिनिधी सहभागी झाले. व्यासपीठावरील मान्यवर व कार्यकर्त्यांसह सुमारे १४० जणांची उपस्थिती होती.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…