पुणे : गणेशोत्सवात प्रत्यक्ष मंदिरात जाऊन आरतीचा अनुभव घेता न येणाऱ्या रुग्ण आणि दिव्यांग सैनिकांसाठी व्हीआर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीचा अनुभव उपलब्ध करून देण्यात आला. खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर (पीआरसी)मध्ये उपचार व पुनर्वसन घेत असलेल्या सुमारे ४५ सैनिकांसह शनिवारवाड्याजवळील सूर्य सह्याद्री रुग्णालयातील रुग्णांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीचा व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभव घेताना प्रत्यक्ष मंदिरात उपस्थित असल्याची भावना सहभागींच्या मनात निर्माण झाली. व्हीआर हेडसेटच्या माध्यमातून ३६० अंशांमध्ये आरतीचा अनुभव देण्यात आला. यावेळी सेंटरचे वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. आर. के. मुखर्जी आणि क्यूबिटच्या शाल्वी पारगे उपस्थित होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकार्याने पुणेस्थित तंत्रज्ञान कंपनी क्यूबिटने हा उपक्रम राबविला. पीआरसीमधील सैनिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्ष मंदिरात जाता येत नसले तरी व्हीआर तंत्रज्ञानामुळे बाप्पासमोर उपस्थित असल्याचा अनुभव मिळाल्याचे सहभागी सैनिकांनी सांगितले. क्यूबिटच्या शाल्वी पारगे म्हणाल्या, “तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भावनिक आणि आध्यात्मिक नाते निर्माण करून आरतीचा अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येणे, ही समाधानाची बाब आहे.”
क्यूबिट गेल्या दहा वर्षांपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीचा व्हीआर अनुभव तयार करीत आहे. यंदा या उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या आरतीचे अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ३६० अंशांमध्ये चित्रीकरण केले जाते. त्यानंतर हे चित्रीकरण व्हीआर अॅप्लिकेशनमध्ये रूपांतरित करण्यात येते. या माध्यमातून रुग्णालयातील रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना दगडूशेठ गणपतीच्या आरतीचा आभासी अनुभव घेता येतो.


