अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ग्राहकांचा जुना वीजवापर, मागणीत अचानक झालेली वाढ किंवा घट, मीटरमधील तांत्रिक फेरफार यासह ५० हून अधिक निकषांचे एआय मॉड्यूल चोवीस तास विश्लेषण करत आहे. संशयास्पद जोडण्यांना ‘हाय रिस्क’ श्रेणीत टाकून तपासणीसाठी प्राधान्य दिले जात आहे.
गेल्या तीन महिन्यांत राज्यात २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी २४ हजार ५०८ प्रकरणांच्या मूल्यांकनातून सुमारे ६६ कोटी २८ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत १० हजार ८१० वीजचोरांकडून सुमारे २९ कोटी ८५ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला असून, दंड न भरणाऱ्या २८९ जणांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणच्या नव्या यंत्रणेमुळे केवळ वीजवापरातील बदलच नव्हे, तर मीटरमधील फेरफार आणि परिसरातील वीजवापराच्या पद्धतींचेही विश्लेषण केले जात आहे. संशयित ठिकाण निश्चित झाल्यानंतर राज्यभरातील १९० हून अधिक भरारी पथकांमार्फत प्रत्यक्ष तपासणी केली जाते.
तपासणीपासून डिजिटल पंचनामा, छायाचित्रे, जागेवर वीजपुरवठा खंडित करणे आणि दंडात्मक देयकाच्या वसुलीपर्यंतची माहिती ऑनलाइन प्रणालीत नोंदविली जात आहे. त्यामुळे वीजचोरीविरोधातील कारवाई अधिक वेगवान आणि नोंदणीय पद्धतीने करण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.वीजचोरीमुळे महावितरणच्या तांत्रिक व वाणिज्यिक हानीवर परिणाम होत असल्याने येत्या तीन वर्षांत ही हानी १० टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे. त्यासाठी वीजचोरीबरोबरच थकबाकी वसुलीवरही भर देण्यात येत आहे. वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाईचा डिजिटल ‘पंचनामा’ आणि एआयच्या मदतीने २४ तास निगराणी, यामुळे वीजचोरी लपविण्याचे आव्हान अधिक कठीण होण्याची शक्यता आहे.


