अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील शेतशिवारात ऊस पिकावर पायरीला रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी अधिकाऱ्यांनी नुकतीच ऊस पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना रोगप्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
अहिल्यानगर जिल्ह्यासह अनेक भागात पावसाचे आगमन लांबल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच ऊस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रगतशील शेतकरी वैभव विवेकानंद फडणीस यांच्या शेतातील ऊस पिकाची कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. श्रीगोंदा तालुका कृषी अधिकारी क्रांतीताई चौधरी यांनी कृषी अधिकारी वर्गासमवेत ऊस पिकाची पाहणी केली. यावेळी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक फवारणी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषीतज्ज्ञ उगले यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक कृषी अधिकारी किरण घोडके यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. पिक पाहणीदरम्यान ज्येष्ठ नेते कैलासराव पाचपुते तात्या, अरु मॅडम तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


